वैजापूरमध्ये जुन्या वादातून रोहित पठारेची निर्घृण हत्या ; तलवार, कुर्‍हाड अन् लोखंडी रॉडने हल्ला


छत्रपती संभाजीनगर (शनिवार, 7 नोव्हेंबर 2026) : जुन्या वादाचा राग मनात धरून तरुणावर तलवार, कुर्‍हाड आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना वैजापूर शहरात घडली. येवला रोडवर झालेल्या या रक्तरंजित संघर्षात गंभीर जखमी झालेल्या रोहित पठारे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर वैजापूरमध्ये संतापाची लाट उसळली असून, आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी नातेवाईक आणि भीमसैनिकांनी तीव्र आंदोलन केले. पोलीस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न, महामार्गावर चार तास रास्ता रोको आणि न्यायालय परिसरातील गोंधळामुळे शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

येवला रोडवर दोन गटांत रक्तरंजित संघर्ष
वैजापूर शहरातील येवला रोडवर 31 ऑक्टोबर रोजी जुन्या वादातून दोन तरुणांच्या गटांत जोरदार हाणामारी झाली. यावेळी एका गटाने तलवारी, लोखंडी रॉड आणि कुर्‍हाडींसारख्या प्राणघातक हत्यारांचा वापर करीत रोहित पठारे याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने शिर्डी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, मृत्यूशी सुरू असलेली त्याची झुंज अखेर अपयशी ठरली. 3 नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.









पोलीस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न ; चार तास रास्ता रोको
रोहितच्या मृत्यूची बातमी समोर येताच नातेवाईक आणि मित्रपरिवारामध्ये संतापाची लाट उसळली. मंगळवारी रात्रीपासून नातेवाईकांनी वैजापूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनादरम्यान एका आंदोलकाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.

दुसर्‍या दिवशी संतप्त नातेवाईक आणि भीमसैनिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात रास्ता रोको आंदोलन केले. तब्बल चार तास चाललेल्या या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली. आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासमोर कुटुंबीयांचा आक्रोश
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी कुटुंबीयांनी पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. सुरुवातीला तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करण्यात आली तसेच आरोपींना पाठीशी घालण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

कुटुंबीयांचे म्हणणे ऐकल्यानंतर पालकमंत्र्यांनी पोलीस तपासाच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली. प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडे सोपवण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून पीडित कुटुंबाला पाच लाख रुपयांची तातडीची मदत देण्याची घोषणाही केली.

आरोपींना न्यायालयात नेताना गोंधळ ; पोलिसांचा बंदोबस्त वाढवला
या हत्येप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून अन्य फरार आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी नेत असताना संतप्त भीमसैनिकांनी त्यांच्यावर धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे न्यायालय परिसरात काही काळ तणाव आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.दरम्यान, या घटनेची तुलना संतोष देशमुख प्रकरणाशी करत कुटुंबीयांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला आहे. आरोपींवर कठोर कारवाई व्हावी आणि तपास निष्पक्षपणे व्हावा, अशी मागणी होत आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वैजापूरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !