दिवाळीचा आनंद आदिवासी बांधवांसोबत साजरा ; वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याहस्ते फराळाचे वाटप
जळगाव (रविवार, 8 नोव्हेंबर 2026) : दिवाळी हा आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण. या सणाचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या भावनेतून वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी आज यावल येथील विटवा वस्तीतील आदिवासी बांधवांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आदिवासी बांधवांसोबत दिवाळीचा आनंद साजरा करत त्यांना दिवाळी फराळाचे वाटप केले.
दिवाळीच्या आनंदमय पर्वानिमित्त लायन्स क्लब भुसावळ यांच्या वतीने या विशेष फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत सणाच्या शुभेच्छा दिल्या.








सण-उत्सवांचा आनंद एकमेकांसोबत वाटून घेतल्याने सामाजिक आपुलकी, बंधुभाव आणि एकतेची भावना अधिक दृढ होते. दिवाळीच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा आणि माणुसकीचा सुंदर संदेश देण्यात आला.
आमदार अमोल जावळे, लायन्स क्लब भुसावळचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.