दिवाळीच्या गर्दीत चोरट्यांवर आरपीएफचा वॉच ; 50 गाड्यांत गस्त वाढवली
24 तासांत विभागातून 200 हून अधिक गाड्यांची वाहतूक ; स्थानकांवर श्वान पथकाकडून दररोज दोन वेळा तपासणी, आउटरवरही बंदोबस्त
भुसावळ (रविवार, 8 नोव्हेंबर 2026) : दिवाळीच्या सुट्या सुरू झाल्याने गावी जाणार्या प्रवाशांची रेल्वे स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये मोठी गर्दी होत आहे. जनरल डब्यांमध्ये पाय ठेवायलाही जागा मिळत नसल्याने प्रवासी मिळेल त्या जागेवर बसून प्रवास करीत आहेत. गर्दीचा फायदा घेत चोरटे प्रवाशांचे मोबाईल, पर्स, दागिने आणि इतर साहित्य लंपास करण्याची शक्यता लक्षात घेऊन रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) सुरक्षेचे नियोजन अधिक कडक केले आहे. विभागातून रात्री धावणार्या 50 हून अधिक गाड्यांमध्ये आरपीएफची गस्त वाढवण्यात आली असून, अतिरिक्त जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकांवर श्वान पथकाकडून प्रवाशांचे साहित्य आणि परिसराची तपासणी केली जात आहे.
200 हून अधिक रेल्वे गाड्यांची ये-जा
भुसावळ विभागातून 24 तासांत सुमारे 200 हून अधिक रेल्वे गाड्यांची ये-जा होते. दिवाळीच्या काळात प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याने स्थानकांवरील गर्दीबरोबरच गाड्यांमधील जनरल डब्यांवरही ताण वाढला आहे. अशा गर्दीत प्रवाशांचे लक्ष विचलित करून मोबाइल, पाकीट किंवा बॅग चोरण्याच्या घटना घडण्याची शक्यता असते. तसेच काही चोरटे स्थानकांवर किंवा आउटर परिसरात संधी साधून पळ काढतात. याला आळा घालण्यासाठी आरपीएफने गस्त आणि तपासणीचे नियोजन केले आहे.








अधिकार्यांची घेतली बैठक
रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ आयुक्त चित्रेश जोशी यांनी अधिकार्यांची बैठक घेऊन प्रत्येक स्थानकावरील बंदोबस्त कडक ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. रात्रीच्या वेळी धावणार्या 50 हून अधिक गाड्यांमध्ये आरपीएफ जवानांची गस्त वाढवण्यात आली आहे. संशयास्पद हालचाली करणार्या व्यक्तींवर लक्ष ठेवणे, गरजेनुसार चौकशी करणे आणि चोरट्यांना संधी मिळू न देणे, यावर भर दिला जात आहे. रेल्वे स्थानकांच्या दोन्ही बाजूंच्या आउटर परिसरातही गस्त वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गाडीतून आउटरवर उतरून पळ काढणार्या चोरट्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.
स्थानकांवरील साहित्याची श्वान पथकाकडून तपासणी
रेल्वे स्थानकांवर दररोज सकाळी आणि संध्याकाळी श्वान पथकाच्या माध्यमातून तपासणी केली जात आहे. प्रवाशांच्या बॅगा, पार्सलमधून पाठवले जाणारे साहित्य तसेच स्थानक परिसरातील संशयास्पद वस्तूंची तपासणी केली जाते. यामध्ये प्लॅटफॉर्म, प्रतीक्षालये, वातानुकूलित प्रतीक्षालये, तिकीट खिडकी परिसर, मुसाफिरखाना, कचराकुंड्या, वाहनतळ आणि स्थानकाच्या इतर भागांचा समावेश आहे. गर्दीच्या काळात बेवारस साहित्य किंवा संशयास्पद वस्तू आढळल्यास तातडीने तपासणी करण्यावर भर दिला जात आहे.
ज्वलनशील पदार्थ आणि फटाके नेण्यास मनाई
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गाड्यांमध्ये फटाके किंवा अन्य ज्वलनशील पदार्थ घेऊन प्रवास करू नये, असे आवाहन आरपीएफने केले आहे. अशा वस्तूंच्या वाहतुकीमुळे गाड्यांमध्ये आग लागण्यासारखी दुर्घटना घडण्याचा धोका असतो. नियमांचे उल्लंघन करणार्या प्रवाशांविरुद्ध रेल्वे कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. बडनेरा ते नाशिक रोड तसेच भुसावळ ते खंडवा या मार्गावरील सर्व रेल्वे स्थानकांवर गस्तीबाबत विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.
- प्रवाशांनीही घ्यावी ही काळजी
- गर्दीत मोबाइल आणि पाकीट सुरक्षित ठिकाणी ठेवावे.
- प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तू उघड्यावर ठेवू नयेत.
- झोपताना बॅग आणि सामानाची काळजी घ्यावी.
- अनोळखी व्यक्तीकडून खाद्यपदार्थ स्वीकारू नयेत.
- बेवारस बॅग किंवा संशयास्पद वस्तू दिसल्यास हात लावू नये.
- फटाके, ज्वलनशील पदार्थ घेऊन रेल्वे प्रवास करू नये.
- संशयास्पद हालचाल दिसल्यास रेल्वे कर्मचारी किंवा आरपीएफला कळवावे