गोळीबारात जखमी झालेल्या मुक्ताईनगरच्या चालकाचा अखेर मृत्यू

जुन्या वादाचा बदला घेण्याच्या वादातून झाला होता गोळीबार ; नऊ दिवसांपासून सुरू असलेलली मृत्यूची झुंज अखेर संपली


वरणगाव (सोमवार, 9 नोव्हेंबर 2026) : वरणगावजवळील फुलगाव पुलाखाली रविवार, 1 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी मुक्ताईनगरातील रहिवासी डंपर चालक सरफराज सैयद सकिर सैयद (24, रा.काझीपुरा, मुक्ताईनगर) या तरुणावर टोळक्याने हल्ला करीत दोन गोळ्या झाडल्या होत्या. एक गोळी डाव्या खांद्याला तर दुसरी गोळी पोटाच्या खालच्या भागात लागली होती तर टोळक्याने लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने केलेल्या मारहाणीत तरुणाचा डावा पाय फ्रॅक्चर झाला होता. जखमी अवस्थेत सरफराज या तरुणावर जळगाव येथे उपचार सुरू असताना त्याची सोमवार, 9 रोजी प्राणज्योत मालवली.

इन्स्टाग्रामवरील ओळख करीत भेटीसाठी बोलावले
सरफराज या तरुणाची सुमारे महिनाभरापूर्वी इन्स्टाग्राम चॅटिंगच्या माध्यमातून वरणगावातील तरुणीशी ओळख झाली होती. रविवार, 1 नोव्हेंबरला सायंकाळी सात वाजेच्या सुमारास तिने त्याला फुलगाव पुलाखाली मुक्ताईनगरकडे जाणार्‍या सर्व्हिस रोडवर भेटण्यासाठी बोलावले. त्यानुसार सरफराज तेथे पोहोचल्यानंतर काही वेळातच दुचाकीवरून दोघे आले व एकाने डोक्यावर लोखंडी रॉडने वार केला त्यामुळे तो जमिनीवर कोसळला व या घटनेत तरुणाचा पाय फ्रॅक्चर झाला. याचवेळी दुसर्‍याने गावठी कट्ट्यातून सरफराजच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. दोन्ही गोळ्या त्याला लागल्याने तो गंभीर जखमी झाला व त्यानंतर संशयीत पसार झाले.









दोन आरोपींना केली अटक
पोलिसांनी या प्रकरणी भूषण उर्फ बिस्ला राजू सावळे (20, रा.फेकरी, ता.भुसावळ) व सिद्धार्थ रामदास ढिवरे (27, रा.फेकरी, ता.भुसावळ) या दोघांना अटक केली. आधीच्या वादातून झालेला बदला घेण्यासाठी हे भयंकर कृत्य करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले होते.

मुक्ताईनगरात शोककळा
गोळीबारातील जखमी सरफराज सय्यद या तरुणाला उपचारासाठी जळगावातील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचार सुरू असतांना सोमवार, 9 नोव्हेंबर रोजी सकाळी त्याचे निधन झाले. सरफराज हा घरातील कर्ता पुरूष असल्याने त्याच्या कुटुंबावर मोठा आघात कोसळला.

 

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !