भुसावळात जामनेर रोडच्या कामाला सुरुवात ; 50 वर्षे जुन्या धोकादायक पुलावर हातोडा !
बाजारपेठ पोलीस ठाणे ते मुंजोबा मंदिर मार्गावर एकेरी वाहतूक ; पूर्वसूचना नसल्याने वाहनधारकांची तारांबळ
भुसावळ (मंगळवार, 17 2026) : भुसावळ शहरातील जामनेर रोडच्या विकासकामांना अखेर सुरुवात झाली आहे. या कामाच्या पहिल्या टप्प्यात छत्रपती शिवाजी महाराज संकुलाजवळील बलबलकाशी नाल्यावरील जुन्या पुलाच्या पाडकामाला सोमवारपासून प्रारंभ करण्यात आला. सुमारे 50 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला आणि स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये धोकादायक ठरलेला हा पूल अखेर जमीनदोस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले तर पुलाच्या पाडकामामुळे बाजारपेठ पोलीस ठाणे ते पांडुरंग टॉकीज परिसरातील मुंजोबा मंदिरापर्यंतची वाहतूक एकेरी करण्यात आल्याने वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून सातत्याने या भागात वाहतूक कोंडी होत आहे.
एकेरी वाहतुकीने कोंडी
सीआरएफ आणि हायब्रीड अॅन्युईटी प्रकल्पांतर्गत जामनेर रोडचे काँक्रिटीकरण, गटारींची निर्मिती, रस्त्याचे रुंदीकरण आदी विकासकामे करण्यात येणार असून या कामांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था आणि रस्त्यांचा दर्जा सुधारण्याची अपेक्षा आहे मात्र बलबलकाशी नाल्यावरील पूर्वेकडील पुलाचे पाडकाम सुरू झाल्याने या मार्गावरील वाहतूक एकेरी करण्यात आल्याने वाहनधारकांना मोठा मनस्ताप होत आहे.
धोकेदायक पुलावर अखेर हातोडा !
1970 ते 1980 या दशकात बांधण्यात आलेला हा पूल अत्यंत जीर्ण झाला होता. विशेष म्हणजे, स्ट्रक्चरल ऑडिटमध्येही तो धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले होते. असे असतानाही या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू होती. आता जामनेर रोडच्या विकासकामांतर्गत या पुलाचीही पुनर्बांधणी होणार असल्याने नागरिक व वाहनधारकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
पूर्वसूचना नसल्याने वाहनधारकांची तारांबळ
सोमवरी पुलाचे पाडकाम सुरू करण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग, शहर वाहतूक शाखा किंवा नगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना अथवा वाहतूक बदलाबाबत माहिती देण्यात आली नसल्याने वाहनधारकांची मोठी तारांबळ उडाली. अचानक एकेरी वाहतूक सुरू झाल्याने अनेक वाहनधारकांची गैरसोय झाली.
वाहतूक नियोजन गरजेचे
सोमवारी सकाळी कामाला सुरुवात झाल्यानंतर तसेच सायंकाळच्या गर्दीच्या वेळी या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. अरुंद मार्गावरून दोन्ही बाजूंच्या वाहनांची ये-जा नियंत्रित करताना वाहनधारकांना कसरत करावी लागली. विकासकामे शहराच्या दृष्टीने महत्त्वाची असली तरी अशी कामे सुरू करण्यापूर्वी नागरिकांना पूर्वसूचना देणे, वाहतुकीचे योग्य नियोजन करणे आणि पर्यायी मार्गांची माहिती देणे आवश्यक असल्याची भावना वाहनधारकांकडून व्यक्त करण्यात आली.
खोदकामात फुटली पाईप लाईन
पुलाचे पाडकाम जेसीबीद्वारे करताना या भागातून गेलेल्या पाईप लाईनला धक्का लागल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी झाली. शहरातील अनेक भागात पाण्याची नासाडी होत असताना पालिकेची यंत्रणा ढीम्म असल्याने संताप व्यक्त होत आहे. शहरातील सतारे भाग, म्युनिसिपल पार्क, बंब कॉलनी, यशोधन पार्क, जामनेर रोड, खडका रोड, जाममोहल्ला, काझी प्लॉट, शांतीनगर, तापीनगर, बद्री प्लॉट आणि शनी मंदिर वॉर्ड या प्रमुख भागांसह शहरातील अनेक अंतर्गत रस्त्यांवर पाईप लाइन फुटल्याची ओरड आहे. गळती रोखण्यासाठी केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
