जळगावात एकाचवेळी तीन बंद घरे फोडली ; मंकी कॅपधारी चोरटे सीसीटीव्हीत कैद
जळगाव (मंगळवार, 17 नोव्हेंबर 2026) : जळगाव शहरातील गिरणा पंपिंग रस्त्यावरील श्यामनगर परिसरात चोरट्यांनी दिवाळीच्या सुट्यांचा फायदा घेत एकाचवेळी तीन बंद घरे फोडली. चोर्या करताना सहभागी असलेले मंकी कॅप घातलेले तीन चोरटे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यांमध्ये कैद झाले असून वाढत्या चोर्यांच्या घटनेमुळे श्यामनगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
बंद घरांना केले टार्गेट
जळगावच्या गिरणा पंपिंग रस्त्यावरील श्यामनगर परिसर हा रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. दिवाळीच्या सुट्यांमुळे अनेक कुटुंबे बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य केले. परिसरातील तीन घरांची कुलुपे तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला. घरांना कुलूप असल्याची खात्री करून चोरट्यांनी चोरीचा डाव आखल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे.
पोलिसांकडून घरांची पाहणी
घरफोड्यांची माहिती परिसरातील नागरिकांनी दिल्यानंतर रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. सीसीटीव्ही कॅमेर्यांचे फुटेज ताब्यात घेऊन चोरट्यांचा माग काढण्यास सुरुवात केली आहे. फुटेजमध्ये तीन संशयित चोरटे मंकी कॅप घालून घरांच्या परिसरात वावरताना दिसत आहेत. त्यांनी चेहरा झाकलेला असल्याने त्यांची ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्यांची चोरी करण्याची पद्धतही स्पष्टपणे दिसत आहे. घराचे कुलूप तोडण्यासाठी त्यांनी कटरचा वापर केला. सुरुवातीला एका चोरट्याने कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला यश आले नाही. त्यानंतर दुसर्या चोरट्याने कटर हातात घेऊन कुलूप कापण्याचा प्रयत्न सुरू केला तर तिसरा चोरटा हातात बॅटरी घेऊन परिसरात लक्ष ठेवताना दिसत आहे. तिघांनी समन्वयाने ही चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे फुटेजमधून दिसून येते.
घर मालक येणार अधिक स्पष्टता
ज्या तीन घरांना चोरट्यांनी लक्ष्य केले, त्या तिन्ही घरांचे मालक सध्या बाहेरगावी असल्याने घरातील नेमका किती ऐवज चोरीला गेला ? किंवा किती नुकसान झाले आहे, याची अद्याप निश्चित माहिती समोर आलेली नाही. घरमालक गावावरून परतल्यानंतर घरातील साहित्याची तपासणी केल्यानंतर चोरीचा नेमका तपशील स्पष्ट होणार आहे. त्यानंतर संबंधितांकडून पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे. दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात अनेक नागरिक कुटुंबासह बाहेरगावी जातात. अशा बंद घरांना लक्ष्य करून चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांनी घरांच्या सुरक्षिततेबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
