अजित पवार मृत्यू प्रकरणाला नवे वळण ; आमदार एकनाथ खडसेंकडून सीबीआय चौकशीची मागणी
आमदार रोहित पवारांचाही आक्रमक पवित्रा : मृत्यूचे गूढ अद्याप कायम
जळगाव (मंगळवार, 17 नोव्हेंबर 2026) : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे. या घटनेला जवळपास आठ महिने उलटूनही तपासाचा अंतिम निष्कर्ष समोर आलेला नसल्याने राजकीय नेत्यांकडून चौकशीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, आमदार रोहित पवार यांनीही अजित पवार यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे त्यामुळे या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.
आठ महिन्यांनंतरही तपासाचा निष्कर्ष नाही ; आमदार खडसे
आमदार एकनाथ खडसे यांनी अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासाला होत असलेल्या विलंबाबाबत चिंता व्यक्त केली. एखाद्या महत्त्वाच्या राजकीय नेत्याच्या मृत्यूला आठ महिने उलटूनही तपासाचा ठोस निष्कर्ष समोर येत नसेल, तर नागरिकांच्या मनात शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे, असे त्यांनी म्हटले. अजित पवार यांचा मृत्यू विमान अपघातामुळे झाला की त्यामागे घातपाताची शक्यता आहे, याबाबत समाजात विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक असून तपासातील स्पष्टतेअभावी संभ्रम कायम असल्याचे खडसे यांनी नमूद केले.
सरकारने स्वतःहून सीबीआय चौकशी जाहीर करावी
अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यासाठी सरकार स्वतःहून पुढाकार का घेत नाही ? असा सवाल आमदार एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला. सरकारनेच या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची घोषणा करावी, अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणाबाबत समाजाच्या मनात निर्माण झालेले संशयाचे वातावरण दूर करण्यासाठी पारदर्शक तपास होणे गरजेचे आहे. सत्य समोर आल्याशिवाय या चर्चांना पूर्णविराम मिळणार नाही मात्र या चौकशीसाठी सरकार का टाळाटाळ करीत आहे? असा प्रश्नही आमदार खडसे यांनी ‘ब्रेकींग महाराष्ट्र’शी बोलताना व्यक्त केला.
रोहित पवारांचा निर्धार ; न्यायासाठी पाठपुरावा सुरूच ठेवणार
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनीही अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणाचा पाठपुरावा सुरू ठेवण्याची भूमिका घेतली आहे. अजितदादांना न्याय मिळेपर्यंत आपला लढा थांबणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणातील विविध मुद्यांवर भाष्य करताना रोहित पवार यांनी व्हीएसआर विमान कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांच्या कथित व्यावसायिक व्यवहारांबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
रोहित पवार यांच्या दाव्यानुसार, अजित पवार यांच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन दिवसांत व्ही. के. सिंग यांनी अमेरिकेतील फ्लोरिडा येथे आलिशान बंगला खरेदी केला. या व्यवहाराच्या वेळेबाबत आणि त्यामागील कारणांबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले असून संबंधित बाबींची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
‘मफलर मॅन’च्या मुद्यावरूनही आरोप-प्रत्यारोप
अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणात चर्चेत आलेल्या ‘मफलर मॅन’च्या ओळखीवरूनही रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणातील कथित आरोपींना कोणाचे संरक्षण आहे, असा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रोहित पवार यांनी केलेले आरोप आणि त्यासंदर्भातील दावे यामुळे या प्रकरणाला राजकीय स्वरूप प्राप्त झाले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
सरकारच्या भूमिकेकडे लक्ष
आमदार एकनाथ खडसे यांची सीबीआय चौकशीची मागणी आणि रोहित पवार यांचा न्यायासाठी सुरू असलेला पाठपुरावा यामुळे अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तपासाला विलंब का होत आहे, उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे कधी मिळणार आणि सरकार सीबीआय चौकशीबाबत काय निर्णय घेणार, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.
