यावल शहरात आज ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताहा’चा समारोप

आदिवासी बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ वितरण


जळगाव (मंगळवार, 17 नोव्हेंबर 2026) : क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त 15 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आलेल्या ‘जनजातीय गौरव दिना’चे औचित्य साधून जळगाव जिल्ह्यात 11 ते 18 नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह-2026’ साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाचा समारोप बुधवार, 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता यावल शहरातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात होत आहे.

यांची असेल उपस्थिती
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या कार्यक्रमास राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असेल.

विविध योजनांचा एकाच छताखाली लाभ
शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या निर्देशानुसार आयोजित या सप्ताहाच्या समारोपप्रसंगी आदिवासी लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती, मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष लाभ वितरित करण्यात येणार आहे. यामध्ये एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासह, महसूल, कृषी, पशुसंवर्धन, जिल्हा अग्रणी बँक, जिल्हा उद्योग केंद्र, उमेद अभियान, कौशल्य विकास विभाग तसेच कृषी विज्ञान केंद्र, पाल यांचा सहभाग राहणार आहे. कृषी अनुदान, आधुनिक शेती, पशुपालन, स्वयंरोजगार, उद्योग उभारणी, बँक कर्ज, महिला बचतगटांचे सक्षमीकरण आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात रक्तदान शिबिरासह आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सिकलसेल आजाराचे वेळेवर निदान व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

आधार, आयुष्मान कार्डसह विविध सुविधा
सेतू सुविधा केंद्रामार्फत नवीन आधारकार्ड, आधारकार्ड दुरुस्ती व अद्ययावतीकरण, आयुष्मान भारत कार्ड आणि एनएसडीएल कार्ड तयार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

आदिवासी संस्कृती, परंपरा, एतिहासिक वारशाचे प्रदर्शन
जिल्ह्यातील विविध आदिवासी जमातींच्या पारंपरिक वेशभूषा, रूढी-परंपरा, लोककला आणि सांस्कृतिक वारशाची माहिती देणारे प्रदर्शन व माहितीपर स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील आदिवासी बांधव, महिला, युवक, शेतकरी व पात्र लाभार्थ्यांनी समारोप कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावल प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !