यावलला दाऊदी बोहरा समाजाचे धर्मगुरू डॉ.मुफद्दल सैफुद्दीन साहेब यांचे जल्लोषात स्वागत
यावल (मंगळवार, 17 नोव्हेंबर 2026) : यावल शहरात दाऊदी बोहरा समाजाचे सर्वोच्च धार्मिक धर्मगुरू परमआदरणीय हिज होलीनेस डॉ. मुफद्दल सैफुद्दीन साहेब यांचे सोमवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात आगमन झाले. त्यांच्या स्वागत तथा दर्शनाकरीता मध्यप्रदेशासह जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातुन हजारो दाऊदी बोहरा समाजबांधव एकत्र आले. शहरात त्यांचे प्रवचन झाले व तीन ठिकाणी त्यांनी भेट दिल्यानंतर ते भुसावळकडे रवाना झाले.
समाजबांधवांनी केले स्वागत
सोमवारी सायंकाळी दाऊदी बोहरा समाजाचे सर्वोच्च धार्मिक धर्मगुरू परमआदरणीय हिज होलीनेस डॉ.मुफद्दल सैफुद्दीन साहेब यांचे मोठ्या उत्साहात आगमन झाले. शहरातील बुरूज चौका आगमन झाल्यावर शहरातील मेन रोडावरून थेट दाऊदी बोहरा समाजाच्या मस्जिद पर्यंत समाज बांधवांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. मशिदीत त्यांनी मोठ्या संख्येत एकत्र आलेल्या दाऊदी बोहरा समाजबांधवांना मार्गदर्शन केले. अनेकांनी त्यांचे दर्शन घेतले. त्यांच्या शहरात झालेल्या आगमनामुळे दाऊदी बोहरा सामज बांधवांमध्ये उत्साह दिसून आला. शहरातील काझीपुरा मशिदीत प्रवचन पार पडल्यानंतर त्यांनी शहरातील दाऊदी बोहरा समाजाच्या एका पिठाच्या गिरणीला तसेच स्कायएस जोहर कलर पॉइंट, कुर्बान हुसेन मोहंमद अली या दुकानांवर भेट दिली.
पोलीस अधिकार्यांचा बंदोबस्त
धर्मगुरूंच्या दौर्याकरीता डीवायएसपी अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहा.पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, पोलीस उपनिरीक्षक एम.जे.शेख, उपनिरीक्षक अनिल महाजनसह आदींनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
एमपीसह खान्देशातून भाविक दाखल
दाऊदी बोहरा समाजाचे धर्मगुरू यांचा यावल शहरातील दौरा ऐतिहासीक असल्याने त्यांच्या दर्शनाकरीता मध्यप्रदेशातील बर्हाणपूर, खंडवा, खरगोनसह जळगाव, धुळे, नंदूरबार जिल्ह्यातुन सुमारे पाच हजाराहून अधिक दाऊदी बोहरा समाज बांधव शहरात दाखल झाले होते. शहरात मोठ्या प्रमाणात दाऊदी बोहरा समाजबांधव येत असल्याने त्यांच्या वाहनांकरीत बोरावल गेटजवळ स्वंतत्र वाहन पार्कींग व्यवस्था करण्यात आली. दाऊदी बोहरा समाजाचे 100 हून अधिक स्वयंसेवक कार्यरत होते.
