शिलाई मशीन देण्याच्या आमिषाने 90 महिलांना तीन लाख दहा हजारांचा गंडा : नशिराबाद पोलिसात जळगावच्या दोघांविरोधात गुन्हा


जळगाव (मंगळवार, 17 नोव्हेंबर 2026) : केवळ 35 टक्के रक्कम भरल्यानंतर शिलाई मशिन देण्याचे आमिष दाखवून तब्बल 90 महिलांची तीन लाख 10 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सप्टेंबर 2025 पासून सुरू असलेल्या या प्रकरणी सपना संजय कोळी आणि संजय कोळी (सोनवणे, दोघे रा. देवकर नगर, खोटे नगरजवळ, जळगाव) यांच्याविरुद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण ?
भादली गावात 35 टक्के रक्कम भरून फूल शटल मोटारीसह शिलाई मशिन मिळेल, अशा आशयाची पत्रके लावण्यात आली होती. या योजनेची माहिती देण्यासाठी सप्टेंबर 2025 मध्ये सपना कोळी आणि संजय कोळी यांनी गावात जाऊन महिलांना योजनेची माहिती दिली. गावातील माधुरी भागवत मिस्तरी (50) यांना यापूर्वी शिलाई म’हन मिळाल्याने त्यांच्यामार्फत इतर महिलांपर्यंत ही योजना पोहोचविण्यात आली. ओळखीतील महिलांकडून पैसे आणि अर्ज जमा करून दिल्यास त्यांनाही मशिन देण्यात येईल, असे दोघांनी सांगितले. त्यानुसार माधुरी मिस्तरी यांनी नातेवाईक आणि परिचीत अशा एकूण 90 महिलांना योजनेची माहिती दिली. या महिलांकडून ऑनलाईन तसेच रोख स्वरूपात एकूण तीन लाख 10 हजार रुपये जमा करून सपना कोळी आणि संजय कोळी यांच्याकडे देण्यात आले. पैसे जमा झाल्यानंतर साडेतीन महिन्यांत शिलाई मशीन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते मात्र ठरलेली मुदत उलटूनही महिलांना मशिन मिळाल्या नाहीत.

अखेर पोलिसात गुन्हा
याबाबत माधुरी मिस्तरी यांनी संबंधित दोघांसह त्यांच्या कार्यालयातील कर्मचार्‍यांकडे वारंवार विचारणा केली मात्र पाठपुरावा करूनही मशिन मिळाल्या नाहीत आणि पैसेही परत करण्यात आले नाहीत. उलट, विचारणा केल्यावर दोघांनी शिविगाळ करून धमकी दिल्याचा आरोप आहे. अखेर माधुरी मिस्तरी यांनी रविवार, 15 नोव्हेंबर रोजी नशिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिलयावरून सपना कोळी आणि संजय कोळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !