चोपड्यात मध्यरात्री घरफोडीचा प्रयत्न उधळला ; पोलिसांसह नागरिकांच्या सतर्कतेने संशयित जेरबंद

चोरट्यांशी झटापटीत दोन पोलीस कर्मचारी जखमी : संशयीतावरही उपचार


चोपडा (बुधवार, 17 नोव्हेंबर 2026) : शहरातील श्रीकृष्ण कॉलनीत मध्यरात्री घरफोडीच्या उद्देशाने फिरणार्‍या संशयिताला नागरिक आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात यश आले. पहाटेच्या सुमारास नागरिकांनी संशयास्पद हालचाली ओळखून आरडाओरड करत परिसरातील रहिवाशांना जागे केले. यानंतर पोलिसांच्या मदतीने संशयिताचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले मात्र, संशयिताला पकडताना झालेल्या झटापटीत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. संशयितालाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकारामुळे चोपडा शहरात खळबळ उडाली आहे.

नागरिकांची सतर्कता
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकृष्ण कॉलनीतील रहिवासी हर्षल मधुकर भोई (31) हे पंचायत समिती चोपडा येथे सिव्हिल इंजिनीअर म्हणून कार्यरत आहेत. सोमवार, 16 नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे 8.30 वाजता कार्यालयीन कामकाज आटोपून ते घरी परतले. रात्री जेवण केल्यानंतर कुटुंबीयांसह झोपले असताना मंगळवारी पहाटे 2.15 वाजेच्या सुमारास घराबाहेर काही लोकांचे आवाज ऐकू आले. खिडकीतून बाहेर पाहिले असता काही इसम कॉलनीत संशयास्पदरीत्या फिरताना दिसले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तातडीने आरडाओरड करत नागरिकांना सावध केले.

चोपडा पोलिसांची सतर्कता
आवाज ऐकताच कॉलनीतील गोकुळ भगवान न्हावी (25), अर्जुन धनराज पाटील (50), पंढरीनाथ छन्नू पाटील (62) आणि भूषण भीमराव पाटील (34) हे नागरिक घराबाहेर आले. नागरिक जागे झाल्याचे लक्षात येताच संशयितांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी रात्री गस्तीवर असलेले चोपडा शहर पोलिसांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. नागरिक आणि पोलिसांनी संयुक्तपणे पाठलाग केला असता एक संशयित त्यांच्या हाती लागला. त्याने आपले नाव आशिष शिवा चव्हाण (19, रा.कन्हेरी, ता.उकशी, जि.धार, मध्यप्रदेश) असे सांगितले.

झटापटीत दोन पोलीस कर्मचारी जखमी
पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने प्रतिकार करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत पोलीस कर्मचारी अक्षय पाटील यांच्या हनुवटीला मार लागला तर पोलीस कर्मचारी जगन्नाथ पाटील यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली. दोन्ही कर्मचार्‍यांनी संशयिताला पकडण्यासाठी प्रयत्न केले. रात्रगस्त ड्युटीवर असलेले पोलीस निरीक्षक पवन देसले यांनीही घटनास्थळी परिस्थिती हाताळली. जखमी पोलिसांसह संशयीयत आशिष चव्हाण याला उपचारासाठी चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आरोपीविरोधात घरफोडीचा गुन्हा ः टोळीचा शोध
दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार, श्रीकृष्ण कॉलनीतील महेंद्र वना पाटील यांच्या बंद घरात पहाटेच्या सुमारास घरफोडी करून चोरी करण्याचा प्रयत्न सुरू असताना आशिष चव्हाण आढळून आला. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. संशयितासोबत आणखी कोणी साथीदार होते का आणि परिसरातील इतर चोरीच्या घटनांशी त्याचा काही संबंध आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !