रब्बी हंगामासाठी सुधारीत प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू

जिल्ह्यातील सहा पिकांचा समावेश ; शेतकर्‍यांना 0.25 ते 1.50 टक्के विमा हप्ता


जळगाव (गुरुवार, 19 नोव्हेंबर 2026) : नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्‍यांना आर्थिक संरक्षण मिळावे, यासाठी राज्यात सन 2026-27 या वर्षासाठी सुधारीत प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात रब्बी हंगामातील जिरायती ज्वारी, बागायती ज्वारी, गहू, हरभरा, रब्बी कांदा आणि उन्हाळी भुईमूग या सहा अधिसूचीत पीक प्रकारांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. कर्जदार आणि बिगरकर्जदार शेतकर्‍यांना या योजनेत सहभागी होण्याची संधी आहे. जास्तीत-जास्त शेतकर्‍यांनी मुदतीपूर्वी विमा उतरवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांनी केले आहे.

या निकषातील शेतकरी पात्र
अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी खातेदार शेतकर्‍यांसह कुळाने किंवा भाडेपट्ट्याने शेती करणारे शेतकरीही पात्र आहेत. मात्र, भाडेपट्ट्याने शेती करणार्‍या शेतकर्‍यांना नोंदणीकृत भाडेकरार पीक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक आहे. योजनेत रब्बी ज्वारीसाठी विमा संरक्षित रक्कम 36 हजार रुपये असून शेतकरी हिस्सा एक टक्का, म्हणजे 360 रुपये आहे. गव्हासाठी 45 हजार रुपये विमा संरक्षण असून 0.25 टक्के दराने 112 रुपये 50 पैसे, हरभर्‍यासाठी 36 हजार रुपये संरक्षण असून 1.50 टक्के दराने 540 रुपये, रब्बी कांद्यासाठी 95 हजार रुपये संरक्षण असून 0.25 टक्के दराने 237 रुपये 50 पैसे, तर उन्हाळी भुईमुगासाठी 40 हजार 600 रुपये संरक्षण असून 101 रुपये 50 पैसे विमा हप्ता भरावा लागणार आहे. सर्व अधिसूचित पिकांसाठी जोखीमस्तर 70 टक्के निश्चित करण्यात आला आहे.

शेतकरी ओळखपत्र अनिवार्य
योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी ओळखपत्र अनिवार्य आहे. तसेच डिजिटल क्रॉप सर्व्हे अर्थात ई-पीक पाहणीची नोंद, बँक पासबुकची स्पष्ट प्रत, अद्ययावत आधारकार्ड आणि पीक लागवड घोषणापत्र आवश्यक आहे. विमा अर्जातील पीक आणि ई-पीक पाहणीतील नोंद यामध्ये तफावत आढळल्यास डिजिटल क्रॉप सर्व्हेतील नोंद अंतिम मानली जाईल आणि अर्ज रद्द होऊ शकतो. किमान 0.10 हेक्टर क्षेत्र असणेही आवश्यक आहे. विमा अर्ज बँक, कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा स्वतः ऑनलाइन पद्धतीने भरता येईल.

अशी आहे अंतिम मुदत
रब्बी ज्वारीसाठी 30 नोव्हेंबर, गहू, हरभरा आणि रब्बी कांद्यासाठी 15 डिसेंबर, तर उन्हाळी भुईमुगासाठी 31 मार्च 2027 ही अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. चुकीच्या मार्गाने विम्याचा लाभ घेतल्याचे आढळल्यास संबंधित शेतकर्‍यांना पुढील पाच वर्षे पीक विमा तसेच नमो शेतकरी महासन्मान योजनेसारख्या कृषीविषयक डीबीटी योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते त्यामुळे अंतिम मुदतीची वाट न पाहता शेतकर्‍यांनी आजपासूनच पीक विमा नोंदणी करावी, असेही आवाहन कृषी विभागाने केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !