उदळी परिसरात शेतकर्यांच्या शेतातील 11 मोटारी फोडल्या : शेतकर्यांचे एक लाख 10 हजारांचे नुकसान
सावदा (शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2026) : सावदा पोलीस ठाणे हद्दीतील उदळी खुर्द परिसरातील 11 शेतकर्यांच्या तापी काठावर इलेक्ट्रीक मोटारी फोडून एक लाख 10 हजारांचे नुकसान करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. हा प्रकार 18 रोजी रात्री 7.30 ते 19 रोजी सकाळी सहादरम्यान घडला. या प्रकरणी सावदा पोलिसात किरण पांडुरंग पाटील (51, दसनूर) या शेतकर्याच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात विकृताविरोधात गुन्हा
शेतकर्याच्या तक्रारीनुसार, त्यांच्यासह अन्य शेतकर्यांच्या तासखेडा, ता.रावेर शिवारातील तापी नदीकाठावर इलेक्ट्रीक मोटारी लावण्यात आल्या होत्या. चोरट्यांनी या मोटारी फोडून त्यातील 124 किलो वजनाची तांब्याची तार चोरून मोटारींचे तब्बल एक लाख 10 हजारांचे नुकसान केले तसेच अॅल्युमिनिअम तारांचेही नुकसान करण्यात आले. तपास सहा.निरीक्षक गणेश फड यांच्या मार्गदर्शनाखाली विजय पोहेकर करीत आहेत.
