सावद्यात मोकाट कुत्र्याला अमानुष मारहाण ; मुक्ताईनगरच्या दोघांविरोधात गुन्हा
सावदा (शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2026) : शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सावदा नगर परिषदेमार्फत एका संस्थेला ठेका देण्यात आला असून या संस्थेच्या दोन कर्मचार्यांनी मोकाट कुत्र्याला पकडताना अमानुषपणे मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. दोघांनी मोकाट कुत्रे पकडताना त्यांच्या गळ्याला फास लावला व त्यांचे दोन्ही पाय जमिनीवर आपटून त्यांना लंगडे करीत रिक्षातून नेले. नागरिकांनी या प्रकाराचे व्हिडिओ शुटींग करीत एका वकिलाकडे पाठवल्यानंतर त्यांनी सावदा पोलिसात तक्रार दिल्यावरून मुक्ताईनगरच्या अर्जुन अण्णा गायकवाड आणि सुनील लक्ष्मण गायकवाड यांच्याविरुद्ध सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले सावद्यात
मिळालेल्या माहितीनुसार, 17 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 2.10 वाजेच्या सुमारास सावदा शहरातील बसस्थानकासमोरील पांडुरंग मेडिकल चौकात हा प्रकार घडला. मोकाट कुत्र्यांना पकडण्याचे काम एका संस्थेला देण्यात आले असून संस्थेशी संबंधित दोन व्यक्तींनी एका कुत्र्याच्या गळ्याला फास लावून त्याचे दोन्ही पाय धरले आणि रस्त्यावर आपटून मारहाण केली. या मारहाणीत कुत्र्याच्या पायाला दुखापत होऊन ते लंगडू लागल्यानंतर संबंधित व्यक्तींनी जखमी कुत्र्याला रिक्षा (क्रमांक एम.एच.19 बी.जे.3566) मध्ये टाकून तेथून नेल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
मुक्ताईनगरच्या दोघांविरोधात गुन्हा दाखल
दरम्यान, हा अमानुष मारहाणीचा प्रकार एका कार्यकर्त्याने मोबाईलमध्ये चित्रीत करीत जळगावचे वकील अॅड.केदार किशोर भुसारी यांना कळवत चित्रफीतही पाठवली. भुसारी हे संरक्षणम गो व पशू सेवा संस्थेत बीओडीमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी सावदा पोलिसात या प्रकरणी तक्रार दिल्यावरून अर्जुन अण्णा गायकवाड आणि सुनील लक्ष्मण गायकवाड या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सावदा नगरपरिषदेमार्फत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठेका दिलेल्या संस्थेच्या कर्मचार्यांकडूनच अशा प्रकारे प्राण्यांशी अमानुष वर्तन झाल्याचा आरोप झाल्याने प्राणीप्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे.
