भुसावळातील बियाणी स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात
विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये दाखवली चमक ; शिस्तबद्ध संचलन ठरले आकर्षण
भुसावळ (सोमवार, 23 नोव्हेंबर 2026) : भुसावळ शहरातील बियाणी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये सोमवार, 23 रोजी वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात झाला. आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून मान्यवरांच्या हस्ते या क्रीडा स्पर्धांचे शानदार उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या चारही हाऊसच्या शिस्तबद्ध संचलनाने झाली. त्यानंतर लहान विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बहारदार नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. या महोत्सवात 100 मीटर व 200 मीटर धावणे, भालाफेक, उंच उडी, लांब उडी, गोळाफेक तसेच क्रिकेट आणि थाळीफेक अशा विविध मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपले क्रीडा कौशल्य सिद्ध केले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी डॉ.संगीता बियाणी, उद्योजक मनोज बियाणी, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, डॉ.तुषार पाटील, विजय फिरके, शाळेचे मुख्याध्यापक रुद्रसेन गंठिया आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खेळाचे महत्त्व पटवून दिले. रजनी सावकारे यांनी जीवनातील खेळाचे स्थान स्पष्ट करत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. डॉ.तुषार पाटील यांनी सुदृढ आरोग्यासाठी खेळ आणि सकस आहार किती आवश्यक आहे. खेळामुळे अंगी शिस्त व नियमबद्धता कशी बणवली जाते, यावर मोलाचे मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन मुख्याध्यापक रुद्रसेन गंठिया यांनी मानले. हा क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक रितेश तायडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
