धुळे शहरातील गोळीबार प्रकरणात मुख्य आरोपी भावेश कौलकरला शहर पोलिसांनी ठोकल्या बेड्या


धुळे (मंगळवार, 24 नोव्हेंबर 2026) : धुळे शहरातील मनोहर टॉकीज परिसरातील चायनीज स्टॉलवर झालेल्या गोळीबार प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून पसार असलेल्या मुख्य आरोपीला धुळे शहर पोलिसांनी अटक केली. भावेश ऊर्फ बबड्या अनिल कौलकर (23, रा.माधवपुरा, गल्ली क्रमांक 5/6 ची बोळ, मारोतीमंदिराजवळ, धुळे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली आहे.

भर दिवसा केला होता गोळीबार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6.30 ते 7 वाजेच्या सुमारास धुळे शहरातील मनोहर टॉकीजजवळ नाटेश्वर इलेक्ट्रीक दुकानासमोरील चायनीज स्टॉलवर गाळा घेण्याच्या वादातून गोळीबाराची घटना घडली होती. तक्रारदार हर्षल दीपक गवळी हा चायनीज स्टॉलवर विक्री करीत असताना त्याच्यासह भावाला शिविगाळ व मारहाण करीत दहशत निर्माण करण्यासाठी गोळीबार करण्यात आला होता. गोळीबारानंतर मुख्य आरोपी भावेश कौलकर हा पसार झाला होता.

सापळा रचून अटक
सोमवार, 23 नोव्हेंबर रोजी धुळे शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांना आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी निर्देश दिले. पथकाने सापळा रचून भावेश ऊर्फ बबड्या अनिल कौलकर याला आर्वी येथील रोकडोबा मंदिर परिसरातून ताब्यात घेत अटक केली.

आरोपीविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल
अटक करण्यात आलेल्या भावेश कौलकर याच्याविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात यापूर्वीही दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दोन आरोपींना यापूर्वीच अटक
या गुन्ह्यात वैभव उर्फ गोलू संजय मेकले (24) व भूपेश उर्फ भूषण तिलकसिंग लोधी (दोन्ही रा.अमर नगर, मनोहर टॉकीजमागे, धुळे) यांना यापूर्वीच देशी कट्टा व जिवंत काडतूसांसह अटक करण्यात आली होती.

यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, धुळ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अर्चना पाटील, अंमलदार जावेद शेख, संजय सूर्यवंशी, रवीकिरण राठोड, कुंदन पटाईत, सुनील राठोड, केतन पाटील आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !