यावल शहरातील धार्मिक स्थळासमोरून अंत्ययात्रेचा वाद : खोटे गुन्हे दाखल केल्याची जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार


यावल (शनिवार, 28 नोव्हेंबर 2026) : जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात यावल शहरातील मुस्लिम समाज बांधवांनी निवेदन दिले. शहरातील बुरुज चौकातील एका धार्मिक स्थळासमोरून अंत्ययात्रा जात असताना कुठलाच वाद झालेला नव्हता व संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात देखील रेकॉर्ड झाला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोघांविरोधात अ‍ॅट्रासिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल झालेल्या गुन्ह्याची सखोल चौकशी करून खोटी तक्रार देणार्‍या विरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

अपर पोलीस अधीक्षकांना निवेदन
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्याकडे मुस्लिम समाजबांधवांनी निवेदन दिले. यात त्यांनी म्हटले आहे की, 18 नोव्हेंबर रोजी यावल शहरातील मागासवर्गीय समाजातील एका महिलेची प्रेतयात्रा बुरुज चौकातील एका धार्मिक स्थळासमोरून जात होती. दरम्यान तेथे समाजातील वयोवृद्ध शहाबुद्दीन उर्फ साबीर समसोद्यीन (64) यांनी वाजंत्रीवरील वाहन धारकाला येथे मशिद आहे, वाजंत्री बंद करून घ्या, असे नम्रपणे सांगितले. या अंत्ययात्रेत सहभागी कामराज रूपचंद घारू हे शेख हबीब शेख निसार उर्फ हबीब मंजर यांच्याकडे गेले आणि आम्हाला वाजंत्री वाजवू नये, असे का सांगतात? असे त्यांनी त्यांना सांगितले.

दरम्यान हबीब मंजर यांनी त्यांना सांगितले की, अंतयात्रा निघून गेलेली आहे जे झाले ते जाऊ द्या नंतर आपण यावर बोलू असे सांगितले व निघून गेले. दुसर्‍या दिवशी यावल पोलीस ठाण्यात त्यांनी प्रारंभी त्यांनी एक अर्ज दिला व नंतर दोन जणांविरुद्ध अ‍ॅट्रासिटीसह विविध कलमान्वये खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना पण दिले आहे व या निवेदनासोबत देखील देत आहोत व या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व गुन्ह्याची देखील सखोल चौकशी व्हावी आणि खोटी तक्रार देणार्‍याविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

यांनी दिले निवेदन
निवेदन देतेप्रसंगी शेख हबीब शेख नसीरसह शेख अलीम शेख रफीयोद्दीन, समीर खान, उमर कच्छी, मजरुद्दीन सैफुद्दीन, रफीउद्दिन, शेख असलम, शहाबुद्दीन, शेख दानिश, कबीर खान सह आदींची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !