मुक्ताईंचे जीवनचरित्र म्हणजे स्त्रीशक्ती, ज्ञान आणि भक्तीचा अद्भुत संगम : संत साहित्याचे अभ्यासक डॉ.जगदीश पाटील
वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघात मुक्ताई या विषयावर व्याख्यान
भुसावळ (शनिवार, 28 नोव्हेंबर 2026) : संत मुक्ताईंचे जीवनचरित्र म्हणजे स्त्रीशक्ती, ज्ञान आणि भक्तीचा अद्भुत संगम होय. आपल्या अलौकिक विचारांनी, अभंग रचनांनी आणि गहन तत्त्वज्ञानाने संत परंपरेत अढळ स्थान निर्माण करणार्या मुक्ताईंच्या विचारांतून समता, सहिष्णुता आणि सकारात्मक जीवनदृष्टीचा संदेश मिळतो. त्यांच्या व्यक्तित्वाचा आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यासपूर्ण वेध घेत डॉ. जगदीश पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांशी आध्यात्मिक संवाद साधला.
ओम सिद्धगुरू नित्यानंद प्रतिष्ठान, भुसावळ संचलित वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघाच्या बैठकीत ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित विशेष आध्यात्मिक संवाद कार्यक्रमात संत साहित्याचे अभ्यासक डॉ. जगदीश पाटील यांनी ‘संत मुक्ताई : व्यक्तित्व, वाङ्मय आणि तत्त्वज्ञान’ या विषयावर अभ्यासपूर्ण निरूपण केले. संत मुक्ताईंचे जीवनचरित्र, त्यांचे आध्यात्मिक योगदान, अभंगरचना, वारकरी संप्रदायातील स्थान आणि खानदेशाशी असलेले ऐतिहासिक व आध्यात्मिक नाते यांचा त्यांनी सखोल आढावा घेतला. त्यांच्या अभ्यासपूर्ण विवेचनाने उपस्थित ज्येष्ठ नागरिक मंत्रमुग्ध झाले.
अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटील होते. सचिव सतीश जंगले, उपाध्यक्ष भानुदास पाटील, सहसचिव संजीव चौधरी, आर. डी. पाटील, गणेश सरोदे यांच्यासह संघाचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि विविध क्षेत्रांतील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. डॉ. नि.तु. पाटील यांच्या संयोजनानुसार सदर संघ कार्यरत आहे.
आपल्या निरूपणाच्या प्रारंभी डॉ.पाटील यांनी संत मुक्ताई हे केवळ एक नाव नसून ते एक तत्त्वज्ञान आणि ज्ञानाचे विद्यापीठ असल्याचे प्रतिपादन केले. संत एकनाथ महाराजांनी मुक्ताईंचे वर्णन ‘आदिशक्ती’ आणि ‘जगत्उद्धारासाठी अवतार धारण केलेली शक्ती’ असे केले असल्याचे सांगत त्यांनी मुक्ताईंच्या श्रेष्ठत्वाची विविध संतांच्या अभंगांच्या आधारे मांडणी केली. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव आणि संत मुक्ताई या चार भावंडांच्या अवतारकार्याचा तसेच तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. संत मुक्ताईंच्या साहित्यिक योगदानावर प्रकाश टाकताना त्यांनी ताटीचे अभंग, ज्ञानबोध, ओव्या, कूट अभंग आणि हरिपाठ या साहित्यप्रकारांचा परिचय करून दिला.
आपल्या समारोपात डॉ.पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवसंपन्न जीवनाचे कौतुक केले. ज्येष्ठ नागरिक संघ हा केवळ एकत्र येण्याचा मंच नसून ज्ञान, अनुभव, विचारांची देवाणघेवाण आणि परस्परांच्या सुखदुःखांत सहभागी होण्याचे सकारात्मक व्यासपीठ असल्याचे त्यांनी नमूद केले. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आनंदी जीवन जगण्यासाठी संतविचार आणि नामस्मरण यांची साथ महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी रमेश चौधरी, पुंजो भारंबे, हेमंत बोंडे, प्रभाकर झांबरे, भरत जंगले, लता चौधरी, जनार्दन राणे, रमेश पाटील, नेमिनाथ राणे, नरेंद्र नेमाडे, ज्योती माळी यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
प्रसंगी सतीश जंगले, प्रकाश पाटील, तुकाराम पाटील, संजीव चौधरी, भास्कर खाचने, लोटू फिरके, शोभा फिरके, लता जंगले, दिवाकर गुळवे, मंगल कोळी, दिलीप मराठे, अनिल नारखेडे, अशोक नेहते, सुरेश नेहते, तुळशीराम नेहते, दिलीपसिंग पाटील, पंडित पाटील, हरी नाटो पाटील, अनिल विक्रम पाटील, पांडुरंग पाटील, विकास मनोहर राणे, नेमीचंद राणे, प्रकाश फालक, मोहन साळुंखे, यशवंत वारके विश्वनाथ वाणी, लीलावती वाणी, राजेंद्र जावळे, आर. डी. पाटील, दिवाकर गुळवे, दिलीप मराठे, शरद पाटील, विजया पाटील, निळू पाटील आदी उपस्थित होते.
