म्हैसवाडीच्या महिला पोलिस पाटलाचे निलंबन
गावातील लग्नाची माहिती दडवल्याने प्रांताधिकार्यांची कारवाई : लग्नातून गावात कोरोनाचा फैलाव झाल्यानेही गुन्हादेखील दाखल
यावल : गावात झालेल्या विवाहांमुळे तालुक्यातील म्हैसवाडीतील 21 ग्रामस्थांना कोरोनाच बाधा तर झाली शिवाय एकाचा मृत्यूही झाल्यानंतर तसेच गावातील लग्नांची माहिती प्रशासनाला न कळवल्याने म्हैसवाडीच्या महिला पोलिस पाटील प्रफुल्ला गोटुलाल चौधरी यांना प्रांताधिकारी अजित थोरबोले यांनी बुधवारी निलंबीत केले आहे शिवाय चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.
प्रांताधिकार्यांच्या आदेशाने खळबळ
म्हैसवाडी, ता.यावल येथील मच्छींद्र जयसिंग चौधरी यांचा मुलगा विक्की व त्यांचे भाऊ गोरख जयसिंग चौधरी यांचा मुलगा जितेंद्र यांच्या विवाहाला 70 ते 80 लोकांचा जनसमुदाय जमला शिवाय सोशल डिस्टन्सला या विवाहात पालन न झाल्याने गावात कोरोनाचा फैलाव होवून 21 जणांना बाधा झाली. असे असतानाही म्हैसवाडी पोलिस पाटील यांनी विवाहाबाबतची तसेच गर्दी जमल्याची माहिती पोलिस यंत्रणा व महसूल यंत्रणेला दिली नाही. गावातून पोलिस यंत्रणेला माहिती पडल्यानंतर म्हैसवाडी पोलीस पाटील प्रफुल्ला चौधरी यांच्यासह दोन्ही विवाह संदर्भात 02 जुलै फैजपुर पोलीस स्टेशन स्टेशन येथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, जळगाव जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचा भंग करणे तसेच पोलीस पाटील या पदावर कार्यरत असताना गावातील माहिती पोलीस स्टेशनला वेळेवर न दिल्याने फैजपूर प्रांताधिकारी अजित थोरबोले यांनी म्हैसवाडी पोलिस पाटील यांचे निलंबन केले असून बुधवारी याबाबतचे आदेश काढण्यात आले.

