बोदवड नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्यांना यांना जीवे मारण्याची धमकी
बोदवड : नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाला असून दोघांनी त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने नगरपंचायतीच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मुख्याधिकार्यांच्या दालनात शेख अकिल शेख इमाम (बोदवड) व शेख जावेद शेख इमाम हे बुधवारी सकाही 11.45 वाजता आल्यानंतर त्यांनी ना हरकत प्रमाणपत्र मिळाले नसल्याचे सांगितल्यानंतर मुख्याधिकार्यांनी कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर 6 जुलै 2020 रोजी दिलेला अर्ज हा अपूर्ण असल्याचे सांगितले तसेच त्रृटींबाबत संबंधिताना सांगितले असल्याचे मुख्याधिकार्यांना सांगितल्यानंतर उभयतांनी मुख्याधिकार्यांशी अरेरावीची भाषा वापरत त्यांना शिवीगाळ केली तसेच त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. यावेळी नगराध्यक्ष पती शे.सईद बागवान, सहा.कार्यालय अधीक्षक राजुसिंग चौहाण, अंकुश मराठे घटनास्थळी उपस्थित होते.
पोलिसांना कारवाईबाबत निवेदन
काही दिवसांपूर्वी तत्कालीन मुख्याधिकारी निलेश देशमुख यांनादेखील अशीच धमकी देण्यात आली होती शिवाय लोक अंगावर मारण्यासाठी धावले होते त्यामुळे प्रशासकीय अधिकार्यांवर जर हल्ले होत असतील तर शासकीय अधिकारी अशा वातावरणात काम करणार कसे? असा प्रश्न उपस्थित होत असून असे प्रकार थांबण्यासाठी पोलिस प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी नगरपंचायत कर्मचारी वर्गाकडून केली जात आहे. या संदर्भात जळगाव जिल्हाधिकारी, बोदवड तहसीलदार तसेच बोदवड पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले.

