जळगाव-शिरसोली-म्हसावद रेल्वेमार्गावर स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग कार्यान्वित

रेल्वे वाहतुकीची सुरक्षितता व मार्गाची क्षमता वाढणार : गाड्यांचा खोळंबा कमी होण्यास मदत


भुसावळ (गुरुवार, 10 सप्टेंबर 2026) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने जळगाव-शिरसोली-म्हसावद या 21.02 किलोमीटर लांबीच्या रेल्वे विभागात स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग प्रणाली यशस्वीरीत्या कार्यान्वित करण्यात आली. मंगळवार, 8 सप्टेंबर 2026 रोजी अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर हे काम पूर्ण करून प्रणाली सुरू करण्यात आली. या तांत्रिक सुविधेमुळे रेल्वे वाहतुकीची सुरक्षितता, परिचालन कार्यक्षमता आणि मार्गाची वहन क्षमता वाढण्यास मोठी मदत होणार आहे.

ऑटोमॅटिक सिग्नल कार्यान्वीत
या प्रकल्पांतर्गत 29 नवीन स्वयंचलित सिग्नल आणि 8 सेमी-ऑटोमॅटिक सिग्नल बसविण्यात आले आहेत. तसेच फ्राउशर कंपनीची मल्टी सेक्शन डिजिटल एक्सल काउंटर प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून, त्यामध्ये दुहेरी ट्रॅक तपासणी, रिअल-टाइम निरीक्षण, पर्यवेक्षी ट्रॅक सेक्शन आणि स्वयंचलित रीसेट यांसारख्या सुविधा आहेत.

150 डिटेक्शन पॉइंटची उभारणी
प्रकल्पात एकूण 150 मल्टी सेक्शन डिजिटल एक्सल काउंटर डिटेक्शन पॉइंट बसविण्यात आले आहेत. यापैकी 72 अप मार्गावर, तर 78 डाऊन मार्गावर आहेत. याशिवाय 48 फायबर ओएफसी केबलचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

फेलसेफ नेटवर्क्ड मल्टीप्लेक्सर प्रणालीचा आयसीसी तसेच स्थानकांवरील स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग डिस्प्लेसाठी वापर करण्यात आला आहे. ईएलडी, फ्यूज अलार्म सेफ्टी आणि आरडीएसओ-मंजूर फायर अलार्म प्रणालीमुळे संपूर्ण यंत्रणेची सुरक्षितता व विश्वासार्हता अधिक मजबूत झाली आहे.

इंटरलॉकिंगमध्येही आवश्यक बदल
स्वयंचलित सिग्नलिंग हट्सचे आरडीएसओ मानकांनुसार अर्थिंग करण्यात आले आहे. शिरसोली येथील क्योसान इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग-62 मध्ये आवश्यक रूट अल्टरेशन करण्यात आले आहे. तसेच एएच-36 आणि एएच-35 येथे सीमेंस कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीची तरतूद करण्यात आली आहे. प्रकल्पाच्या संयुक्त कामाचा भाग म्हणून स्वयंचलित सिग्नलिंग हट्सची उभारणीही करण्यात आली.

जळगाव-मनमाड मार्गावर परिणाम
जळगाव-शिरसोली-म्हसावद विभागात स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग सुरू झाल्यामुळे या मार्गाची लाईन क्षमता वाढणार आहे. परिणामी जळगाव-मनमाड मार्गावर अधिक गाड्या चालविणे शक्य होईल, गाड्यांचा खोळंबा कमी होण्यास मदत होईल आणि रेल्वेचे वेळापत्रक अधिक कार्यक्षमपणे राबविता येणार आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांना अधिक सुरक्षित, सुरळीत आणि वेळेवर प्रवासाचा अनुभव मिळण्याची अपेक्षा आहे.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !