भुसावळात विघ्नहर्त्याच्या मार्गावरील अडथळे होणार दूर ! प्रशासनाकडून मार्गाची पाहणी

खड्ड्यांची होणार डागडूजी तर वाहतूक व्यवस्थेचे काटेकोर नियोजन


भुसावळ (गुरुवार, 10 सप्टेंबर 2026) : विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन अवघ्या तीन दिवसांनी होणार असल्याने गणेशोत्सवासह विसर्जन मिरवणूक शांततेत, सुरक्षित आणि सुरळीत पार पडावी, यासाठी भुसावळात प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. याच पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी), तहसीलदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वात गुरुवारी शहरातील प्रमुख विसर्जन मिरवणूक मार्ग तसेच तापी नदीकाठावरील विसर्जन स्थळांची संयुक्त पाहणी करण्यात आली. यावेळी विघ्नहर्त्याच्या मार्गावरील अडथळे दूर करण्याच्या सूचना पालिकेला करण्यात आल्या.

उपाययोजनांचा अधिकार्‍यांकडून आढावा
पाहणीदरम्यान गणेश विसर्जनाच्या दिवशी निर्माण होणारी गर्दी, मिरवणुकीचे नियोजन, वाहतूक व्यवस्था, विद्युत सुरक्षा, आपत्कालीन परिस्थितीतील उपाययोजना तसेच तापी नदीकाठावरील सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

विविध विभागांचा सहभाग
संयुक्त पाहणीमध्ये भुसावळ नगरपरिषद, महावितरण अग्निशामक दल, वृक्ष छाटणी विभाग, बाजारपेठ निरीक्षक राहुल वाघ, शहरचे निरीक्षक महेश गायकवाड, शहर वाहतूक शाखेचे सहा.निरीक्षक राहुल भंडारे आदी सहभागी होते. प्रत्येक विभागाने आपल्या कार्यक्षेत्रातील संभाव्य अडचणी आणि आवश्यक उपाययोजनांची माहिती प्रशासनाला दिली.

तापी घाटांवर विशेष लक्ष
गणपती विसर्जनासाठी वापरल्या जाणार्‍या तापी नदीकाठावरील घाटांची पाहणी करून तेथील सुरक्षिततेचा आढावा घेण्यात आला. घाटापर्यंत जाणारे रस्ते, उतरणीची ठिकाणे, बॅरिकेटिंग, गर्दी नियंत्रण तसेच रात्रीच्या वेळी विसर्जन करणार्‍या गणेश मंडळांसाठी पुरेशी प्रकाशयोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. विसर्जनाच्या वेळी भाविक नदीपात्रात घसरून पडू नयेत, यासाठी आवश्यक त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचनाही संबंधित विभागांना देण्यात आल्या.

मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करण्याच्या सूचना
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर असलेल्या धोकादायक किंवा मिरवणुकीस अडथळा ठरणार्‍या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याच्या सूचना नगरपरिषद प्रशासनाला देण्यात आल्या तसेच रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, खराब रस्त्यांची आवश्यक दुरुस्ती करणे आणि मिरवणुकीदरम्यान नागरिकांना अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले.

विद्युत सुरक्षेची तपासणी
मिरवणूक मार्गावरील विद्युत वाहिन्या, खांब आणि इतर विद्युत यंत्रणेचीही पाहणी करण्यात आली. मिरवणुकीतील रथ, देखावे किंवा उंच सजावटीमुळे विद्युत वाहिन्यांना धोका निर्माण होणार नाही, यासाठी महावितरणच्या अधिकार्‍यांनी आवश्यक ती तपासणी करून खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले.

आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यावर भर
विसर्जनाच्या वेळी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ मदत मिळावी, यासाठी अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि प्रशिक्षित पोहणारे जवान तैनात ठेवण्याच्या उपाययोजनांवर भर देण्यात आला. नदीकाठावरील संवेदनशील ठिकाणी आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध ठेवण्याबाबतही सूचना करण्यात आल्या.

वाहतूक व्यवस्थेचे नियोजन
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या काळात शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात आवश्यक बदल, पर्यायी मार्ग, जड वाहनांना प्रवेशबंदी आणि गर्दीच्या ठिकाणी बॅरिकेटिंग याबाबत नियोजन करण्यात येत आहे. मिरवणुकीच्या मार्गावर अनावश्यक वाहनांची गर्दी होणार नाही, यासाठी वाहतूक शाखेला विशेष नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन
गणेशोत्सव हा भुसावळच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनातील महत्त्वाचा उत्सव असून, तो शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी सर्व विभागांकडून समन्वयाने काम केले जात आहे. नागरिकांनी तसेच गणेश मंडळांनी प्रशासन आणि पोलिसांनी दिलेल्या सुरक्षा सूचनांचे पालन करावे, मिरवणुकीत शिस्त राखावी आणि विसर्जनस्थळी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधीक्षक केदार बारबोले यांनी केले आहे.

खड्ड्यांची होणार दुरुस्ती : पथदिवे दुरुस्तीसाठी कंत्राट
भुसावळातील केवळ यावल रस्त्याची दुरवस्था असून लवकरच या रस्त्यावरील खड्ड्यांची डागडूजी केली जाईल शिवाय अडथळे ठरणार्‍या झाडाच्या फांद्या छाटण्यात येत असून पथदिव्यांची समस्या लवकरच सोडवण्यात येईल. पथदिवे व हायमास्ट दुरुस्तीसाठी टेंडर काढण्यात आले असून लवकरच प्रक्रिया पूर्ण होवून नागरिकांना दिलासा मिळेल, असे प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे म्हणाल्या.

 

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !