सावदा पालिकेस दलित वस्ती निधी यादीतून वगळले ! मुख्याधिकार्यांनी सांगितले नेमके कारण
तांत्रिक कारणामुळे नाव वगळल्याची मुख्याधिकार्यांची माहिती ; लवकरच 66 लाखांचा निधी मिळणार असल्याची दिली माहिती
सावदा, ता.रावेर (गुरुवार, 10 सप्टेंबर 2026) : सावदा पालिकेस दरवर्षी जिल्हा नियोजन समितीद्वारे दलित वस्ती सुधारणा निधी मिळतो मात्र यंदा या निधीच्या यादीतून सावदा पालिकेचे नाव वगळण्यात आल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत होती. या संदर्भात मुख्याधिकारी भूषण वर्मा यांनी माहिती देताना सांगितले की, पालिकेला निधीतून वगळण्यात आल्याची बाब ही तांत्रिक असून लवकरच निधीच्या यादीत पालिकेचे नाव समाविष्ट होईल व निधीदेखील मिळेल, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
काय आहे प्रकरण?
जिल्हा नियोजन समितीतर्फे दरवर्षी सावदा नगरपालिकेस निधी प्राप्त होतो मात्र यंदाच्या यादीत सावदा पालिकेचे नाव नसल्याने शहरात एकच खळबळ उडाली. निधीईभावी शहरात कामे करण्यास अडचण निर्माण होणार होती शिवाय ही कामे कोणत्या निधीतून करायची? असादेखील प्रश्न होता. दरम्यान, 9 सप्टेंबर रोजी नगराध्यक्षा रेणुका पाटील, नगरसेवक सचिन बर्हाटे, नकुल बेंडाळे यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट घेत घडल्या प्रकाराची माहिती देत निवेदन देवून कामांचे प्रस्तावही सादर केले.
66 लाखातून होणार कामे : मुख्याधिकारी
सावदा मुख्याधिकारी भूषण वर्मा यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधीने संवाद साधला असता ते म्हणाले की, दलित वस्तीच्या निधी यादीत सावदा शहराचे नाव नसल्याची बाब ही तांत्रिक आहे. हा निधी दरवर्षी सर्व नगरपालिकाना लोकसंख्येच्या निकषांवर मिळतेा. सावदा पालिकेचे या यादीत नाव नसणे ही एक तांत्रिक चूक असून याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे संपर्क केला असून त्यांनीदेखील ते मान्य करून लवकरच सावदा पालिकेचे नाव या यादीत समाविष्ट करण्यात येईल, असे सांगितले आहे. जाहीर करण्यात आलेली यादी अंतीम नाही व निधीचेदेखील वाटप झालेले नाही. लवकरच अंतीम यादीत सावदा शहराचे नाव समाविष्ट असेल, असे मुख्याधिकारी म्हणाले.
सावदा शहरास दलितेतर वस्ती व नगरोत्थान अनुदान अंतर्गत जिल्हानियोजनतर्फे 66 लाखांचा निधी मंजूर झाला असून यातून शहर विकासाची कामे होतील तसेच दलित वस्ती सुधारणा निधी यादीत देखील सावदा पालिकेचे नाव येईल व निधी प्राप्त होईल, असा विश्वास मुख्याधिकारी भूषण वर्मा यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादीनेही दिले निवेदन
राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे देखील राष्ट्रवादीचे पालिकेतील गटनेते नगरसेवक राजेश वानखेडे, विशाल तायडे, नगरसेविका सीमा लोखंडे यांनी देखील जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे याच बाबतीत निधी प्राप्तीसाठी विनंती करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

