भुसावळात रेल्वे कर्मचार्याची चाकूचे वार करीत हत्या : संशयीत ताब्यात !
गणेश वाघ
भुसावळ (गुरुवार, 10 सप्टेंबर 2026) : शहरातील 35 वर्षीय रेल्वे कर्मचारी असलेल्या तरुणाची चाकूचे वार करीत हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना गुरुवार, 10 रोजी रात्री 8.30 वाजेनंतर शहरातील पाटीलमळा भागात घडली. तुषार गोविंद सोनवणे (35, समता नगर, भुसावळ) असे मृताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. खुनाचे स्पष्ट कारण मात्र कळू शकले नाही.
अचानक चाकूचे वार करीत हत्या
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, तुषार सोनवणे हा तरुण भुसावळ रेल्वेत नोकरीला असल्याची प्राथमिक माहिती आहे. गुरुवरी रात्री तुषार हा परिचिताची दुचाकी (एम.एच.19 सी.एच.1405) घेवून पाटीलमळा भागातून जात असताना अल्पवयीन संशयीताशी त्याचा कुठल्यातरी कारणातून वाद झाला व संशयीताने पाठीमागून डोक्याखाली व पाठीवरील भागात चाकूचे सपासप वार केल्याने अतिरक्तस्त्रावाने जागीच तरुणाचा मृत्यू झाला.
112 वर कॉल अन् आरोपी जाळ्यात
गुरुवारी रात्री साडेआठ वाजेनंतर पोलिसांच्या 112 क्रमांकावर आलेल्या दूरध्वनीनंतर बाजारपेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जळगाव गुन्हे शाखेतील पथकाचे कर्मचारी शहरात असल्याने त्यांनी संशयीत पायी पसार झालेल्या मार्गाने धाव घेत मिळालेल्या माहितीवरून अल्पवयीनास ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.
पोलीस अधिकार्यांची घटनास्थळी धाव
पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक पथकालाही यावेळी पाचारण करण्यात आले. भुसावळ शहर व विभागात पोळा सण उत्साह व शांततेत पार पडल्यानंतर रात्रीच्या सुमारास झालेल्या निर्घृण खुनामुळे शांततेवर विरजण पडले आहे.

