ग्राहकांना होणार सुरळीत वीजपुरवठा
शिवसेना पदाधिकार्यांना महावितरण पदाधिकार्यांची ग्वाही : वीज बिलातही दिलासा
भुसावळ : शहरातील ग्राहकांना मिळणार्या अवाजवी वीज बिलांसह वारंवार खंडित होणार्या वीजपुरवठ्याबाबत शिवसेना पदाधिकार्यांनी आवाज उठवत या संदर्भात सुधारणा न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. या संदर्भात महावितरणने यापुढे नियमित वीजपुरवठा करण्यासंदर्भात लेखी आश्वासनाचे पत्र मंगळवारी अभियंता व्ही.बी.पाटील यांनी शिवसेना तालुका संघटक प्रा.धीरज पाटील व शहरप्रमुख बबलू बर्हाटे यांना दिले. याप्रसंगी उपशहर प्रमुख पवन नाले, उपशहर प्रमुख धनराज ठाकूर, युवासेना शहरप्रमुख सुरज पाटील, विभागप्रमुख अमोल पाटील, लोकेश वाणी, सुरज चौधरी, कुमार भारंबे आदी उपस्थित होते.
अवाजवी वीज बिलांबाबतही दिलासा
भुसावळ शहरातील खळवाडी, काशीराम नगर, जळगाव रोड विभागात जीनस कंपनीच्या चुकीमुळे ग्राहकांना अवाजवी बिले मिळाली होती शिवाय वारंवार शहरात अनियमित वीजपुरवठा महावितरणकडून होत असल्याने अनागोंदी कारभाराबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख व आमदार चंद्रकांत पाटील, तालुकाप्रमुख समाधान महाजन यांच्या नेतृत्वाखाली 16 जुलै रोजी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने व पदाधिकार्यांनी कार्यकारी अभियंता प्रदीप घोरुडे यांना तक्रारी न सोडवल्यास महावितरण कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. मंगळवार, 21 जुलै रोजी खळवाडी परीसरातील भरत दिनकर पाटील यांचे चार हजार 900 रुपये वीज कमी करण्यात आले तर काशीराम नगर भागातील लक्ष्मण पाटील यांच्या नावाने असलेल्या देयकात आठ हजार रुपये कमी करून दुरुस्ती करण्यात आली तसेच श्रीनगर भागातील टोपेश महाजन व प्रदीप हिरामण राणे यांना एक वर्षापासून दुसर्याच ग्राहकाचे वीज देयक दिले जात असल्याने त्यांना वीज मीटर बदलवून देण्यात आले शिवाय भुसावळातील 600 ग्राहकांच्या मीटरची दुरुस्ती करण्यात येणार असल्याची ग्वाहीदेखील देण्यात आली.
त्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका
खंडित वीज पुरवठ्याची ठोस कारणे ग्राहकांना दिली पाहिजे, मेंटेनन्सची कामे करतांना ग्राहकांना मेसेज पाठवणे, दिलेल्या वेळेत कामे पूर्ण करणे, विभागनिहाय तक्रार केंद्रे व संपर्क प्रसिद्ध करावे तसेच चुकी करणार्या जीनस कंपनीच्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी प्रसंगी प्रा.धीरज पाटील यांनी केली.

