राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे कोरोना योद्ध्यांचा सन्मान
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
भुसावळ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परीषद सदस्य रवींद्र नाना पाटील यांच्या वतीने भुसावळ तालुक्यातील वराडसीम आरोग्य केंद्र येथे कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला व कोरोना योद्धा भगिनींच्या हस्ते केक कापुन त्यांच्या सोबत वाढदिवस साजरा करण्यात आला.
कोरोनामुळे कार्यक्रम रद्द
अजित पवार यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांसाठी एक मोठी पर्वणी असलीतरी यंदा राज्यात कोरोनाने थैमान घातले असून दिवसेंदिवस झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय पवार यांनी घेतला आहे. आपल्यावर प्रचंड प्रेम करणार्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्यांनी तसे आवाहन केल्याने सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले मात्र कोरोनाची महामारी कमी होण्यासाठी सरकार तत्परतेने काम करत असल्याने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे भुसावळ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन समाजासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काम करणारे डॉक्टर, आरोग्य सेविका, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका व इतर आरोग्य कर्मचारी यांचे पुष्प गुच्छ व सन्मान पत्र तसेच भगिनींना साडी-चोळीसाठी रोख रक्कम देवून सन्मानीत करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा परीषद सदस्य रवींद्र नाना पाटील, गटविकास अधिकारी विलास भाटकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संगीता दवंगे, डॉ.शीतल कदम, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी तालुकाध्यक्ष सागर दोळे, युवक जिल्हा चिटणीस मंगेश पाटील, माजी सरपंच विलास पाटील, योगेश नरोटे, देवेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाभरात होणार सन्मान : रवींद्र पाटील
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाभरात कोरोना योद्ध्यांचा सन्मान करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांनी दिली.1

