जळगावात बंद घरातून टीव्हीची चोरी : दोघा आरोपींना अटक
जळगाव : शहरातील रामेश्वर कॉलनीतील मंगलपुरी भागातून काजल साळुंखे यांच्या बंद घरातून चोरट्यांनी 22 हजार रुपयांचा एलईडी टी.व्ही.लांबविल्याची घटना 18 जुलै रोजी समोर आली होती. या गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांनी दगडू प्रल्हाद शिंदे (30) व गौरव रवींद्र खरे (21) दोन्ही रा. मंगलपुरी, रामेश्वर कॉलनी या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. दोघा संशयितांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली. गेंदालाल मिल परिसरातील आकाश जगन साळुंखे यांची बहिण काजल साळुंखे रामेश्वर कॉलनी परिसरात मंगलपुरी येथे राहतात. 10 जुलै ते 18 जुलै दरम्यान त्या बाहेरगावी गेल्या होत्या. घर बंद असल्याची संधी पाहून 10 जुलै रोजी त्यांच्या घरातील 22 हजार रुपये किंमतीचा टी.व्ही. चोरट्यांनी लांबविला होता. याप्रकरणी 22 रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्यातील संशयितांबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील पोलिस नाईक इम्रान सय्यद यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी याबाबत पोलिस निरीक्षक विनायक लोकरे यांना माहिती दिली. लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, इम्रान सय्यद, सचिन पाटील, मुदस्सर काझी, योगेश बारी यांच्या पथकाने नशिराबाद येथून माहितीनुसार दगडू प्रल्हाद शिंदे व गौरव रविंद्र खरे या दोघांना नशिराबाद येथून ताब्यात घेतले. संशयितांने सदरचा टीव्ही त्याच्या मेव्हण्याच्या घरी लपविला होता. पोलिसांनी हा टीव्ही हस्तगत केला आहे. दोघा संशयितांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली. पुढील तपास पोलिस नाईक इम्रान सय्यद करीत आहेत.

