भानखेड्यातील प्रलंबीत प्रधानमंत्री ग्रामीण घरकुल योजना यादी अखेर मंजूर


भानखेडा येथील नागरीकांनी मानले शासनाचे आभार

बोदवड : तालुक्यातील भानखेडा येथील प्रलंबीत प्रधानमंत्री ग्रामीण घरकुल योजेची 152 लाभार्थींची यादी अखेर मंजूर झाल्याने ग्रामस्थांनी शेतकर्‍यांचे आभार मानले आहेत. भानखेडा गावातील पात्र लाभार्थींनी शासनाचे व तत्कालीन सरपंच नामदेव गायकवाड व ग्रामसेवक मोहन पाटील यांचे आभार मानले आहेत. प्रधानमंत्री ग्रामीण घरकुल योजनेमार्फत वंचित पात्र नागरीकांना या माध्यमातून पक्के घरे व्हावीत या उद्देशाने 2015 साली या काळात ग्रामपंचायत सरपंच नामदेव गायकवाड व ग्रामसेवक मोहन पाटील यांनी शासनाच्या आदेशाचे पालन करीत गावात ग्रामसभा बोलावून योग्य पात्र लाभार्थींची नाव नोंदवत तसा प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केला होता.

घराचे स्वप्न होणार पूर्ण
पाच वर्षानंतर घरकुल योजनेची 152 नागरीकांची यादी मंजूर झाली असून लाभार्थींना पक्की घरे मिळणार असल्याने आनंद व्यक्त होत आहे. भानखेडा येथील डाटा ऑपरेटर योगेश भागवत पाटील यांनी कागदपत्रांकामी नागरीकांना सहकार्य केल्याने नागरीकांनी त्यांचे आभार मानले आहेत. भानखेडा येथील काही पात्र लाभार्थींकडे स्वतःची जागा नसल्याने ग्रामपंचायतीने इतर ठिकाणी असलेल्या गावठाण जागेत लाभार्थींना जागा द्यावी, अशी मागणीही नागरीक करीत आहेत. बोदवड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी रमेश वाघ म्हणाले की, घरकुल यादी ही ‘ड‘ वर्गातील असून अनुक्रमे ब ची यादी संपल्यानंतर ड यादीनुसार कामे होतील शिवाय डिसेंबरअखेर पर्यंत कामाला सुरुवात होईल, असेही त्यांनी सांगत नागरीकांना घरकुल योजनेचा लाभ कसा मिळेल ? याकडे आम्ही लक्ष ठेवून असून नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे ते म्हणाले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !