रावेर तालुक्यात 95 ग्रामपंचायतीत ऑक्सिजन सुविधा
रावेर गटविकास अधिकार्यांनी घेतली ग्रामविस्तार अधिकार्यांची बैठक : ग्रामसेवकांची चार टप्प्यात बैठक
रावेर : कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना होणारा श्वसनाचा त्रास गाव पातळीवरच कमी करता यावा यासाठी रावेर तालुक्यातील 95 ग्रामपंचायतीत ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करण्यासाठी येथील पंचायत समिती स्तरावरून कार्यवाही सुरू आहे. या संदर्भात गटविकास अधिकारी डॉ.सोनिया नाकाडे यांनी ग्रामविस्तार अधिकार्यांची बैठक शुक्रवारी घेऊन याबाबत सूचना दिल्या आहेत. कोरोना व्हायरसचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव ग्रामीण भागात झालेला असून पॉझीटीव्ह असलेल्या रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. संसर्ग झालेल्या अनेक रुग्णांमधील रक्तातील ऑक्सिजनची पातळी घटत असल्याने या रुग्णांना श्वसनाचा त्रास होत असल्याने अधिक धोका असल्याचे दिसून आलेले आहे.
ग्रामपंचायत स्तरावर ऑक्सीजनची सुविधा
तालुका किंवा जिल्हास्तरावरील रुग्णालयात अशा रुग्णाला नेत असतांना त्याचा मृत्यू होण्याची शक्यता असल्याने ऑक्सिजनची सुविधा आता प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करू देण्याचा प्रयत्न आहे. त्यानुसार गटविकास अधिकारी सोनिया डॉ.नाकाडे यांनी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत सुविधा निर्माण करण्यासाठी कारवाई सुरू केली आहे.
हॉटस्पॉट ग्रामपंचायतीत तत्काळ सुविधा
तालुक्यातील खानापूर, चिनावल, निंभोरा बुद्रुक, खिर्डी, विवरा खुर्द या गावात कोरोना संसर्गाचे अधिक रुग्ण असल्याने आरोग्य विभागाच्या दृष्टीने ही गावे कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत त्यामुळे तालुक्यातील हॉटस्पॉट असलेल्या व मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये ऑक्सीजन सिलिंडर व त्यासाठी लागणार्या मास्कची सुविधा आठवडाभरात ग्रामपंचायतीकडून उपलब्ध करण्यात येणार आहे.
95 ग्रामपंचायतीत सुविधा होणार
तालुक्यात एकूण 118 गावे असून 95 ग्रामपंचायती आहेत. या सर्व ग्रामपंचायतीत 8 ते 10 दिवसांत दोन ऑक्सिजन सिलिंडर व त्यासाठी लागणारे मास्क उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी सोमवारपासून ग्रामसेवकांची चार टप्प्यात बैठक बोलवण्यात आली आहे. ग्रामपंचायतींनी ऑक्सिजन सिलेंडर व मास्क स्वखर्चाने अथवा लोकवर्गणीतून उपलब्ध करायचे आहे.

