यावलमध्ये गोवंशाची हत्येच्या उद्देशाने वाहतूक : तिघांविरुद्ध गुन्हा
यावल : गोवंश हत्येच्या उद्देशाने वाहनातून दोन वर्षाच्या बैलाची वाहतूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गोवंशाची हत्येच्या उद्देशाने वाहतूक करताना खिर्नीपुर्याजवळ पॉईंटवर असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी वाहन थांबवण्याचा इशारा केला मात्र वाहन चालकाने दुर्लक्ष करीत तो बैल मूळ मालकाकडे सोडल्याची घटना सोमवारी पहाटे पाच वाजता घडली होती. या प्रकरणी आरोपी रईस बिसमील्ला खा, साजीद अजीज सय्यद व अब्दुल रशीद कच्छी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी वाहन (क्रमांक एम.एच.14 डी.एम.1614) मधून 15 हजार रुपये किंमतीचा दोन वर्षाचा बैल आणत असतांना शहरात पहाटेच्या वेळी डयुटीवर कार्यरत असलेले पोलिस गणेश मधुकर ढाकणे यांच्या निदर्शनास आले असता त्यांनी हे वाहन थांबविण्यास सांगीतले असता वाहनचालकाने त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत वाहन पळवून नेत बैलास मूळ मालकाकडे पुनश्च नेवून सोडले. या प्रकरणी कॉन्स्टेबल गणेश ढाकणे यांच्या फिर्यादीवरून विना परवाना गोवंश खरेदी-विक्री व तस्करी करणे तसेच पशुक्रुरता अधिनियमान्वये तिघांविरूध्द येथील यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नितीन चव्हाण करीत आहेत.

