वरणगावातील मॉडेल शौचालयाची नासधूस
सार्वजनिक शौचालय सुरू करण्याची माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांची मागणी
वरणगाव : स्वच्छ भारत अभियाच्या 14 व्या वित्त आयोगांतर्गत वरणगाव शहरात तीन ठिकाणी मॉडेल शौचालयाची निर्मिती करण्यात आली असलीतरी या शौचालयांमध्ये वीज व पाणीपुरवठा नसल्याने या ठिकाणी वापर होत नसल्याने या शौचालयांची नासधूस होवून पालिकेच्या मालमत्तेचे नुकसान होत आहे. या ठिकाणी पाणीपुरवठा व वीजपुरवठा करून नागरीकांसाठी वापरासाठी खुले करावे, अशा प्रकारची मागणी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केली आहे.
शौचालयांच्या दारांचे नुकसान
स्वच्छ भारत अभियानांतर्गत सिद्देश्वर नगर, अक्सा नगर, रावजी बुवा येथे प्रत्येकी 68 लक्ष रुपयांचे सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले मात्र पाणी व लाईट उपलब्ध नसल्याने तेथील जनतेला सार्वजनिक शौचालयाचा लाभ मिळत नाही. परीणामतः सिद्देश्वर नगर येथील 68 लक्ष रुपयांच्या शौचालयाची दारे शौचालयाच्या भांड्यांसह स्टाईलचे नुकसान करण्यात आले आहे. पालिकेच्या या मालमत्तेचे नुकसान अधिकार्यांच्या दुर्लक्षतेमुळे होत आहे. सार्वजनिक शौचालय बांधून पूर्ण झाले या ठिकाणी पाणी आणि लाईट लावणे बंधनकारक असतांना तिथे लावले गेले नसल्याने पालिकेच्या मालमत्तेचे नुकसान होत आहे. झालेल्या नुकसानाची चौकशी करून जे कुणीही जवाबदार असतील त्यांची चौकशी करून तत्काळ कार्यवाही करावी तसेच मोड-तोड झालेल्या सार्वजनिक शौचालयाची तात्काळ दुरुस्ती करण्यात येऊन सिद्देश्वरनगर, अक्सानगर, रावजी बुवा येथील सार्वजनिक शौचालयात पाणी पुरवठा व लाईट फिटिंग तत्काळ करून जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, माजी उपनगराध्यक्ष शेख अखलाख शेख युसूफ, माजी नगरसेविका माला मेढे, मेहनाज इरफान पिंजारी यांनी प्रशासक व मुख्यधिकारी यांच्याकडे केली आहे. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी यांनादेखील पाठवण्यात आली आहे.

