तिन्ही भावडांपर्यंत पोहोचली संत मुक्ताईंची राखी


भुसावळ : श्री क्षेत्र मेहूण तापी तीरावरील संत आदिशक्ती मुक्ताई यांच्याकडून श्रीक्षेत्र आळंदी, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर आणि श्री क्षेत्र सासवड अशा तिन्ही ठिकाणी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राखी पाठविण्यात येवून भावंडांच्या चरणी अर्पण करण्यात आली. रक्षाबंधन सण बहिण-भाऊ यांचे नातेसंबंध अधिक दृढ करण्याचे काम करतो. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्‍वर, संत सोपानदेव आणि आदिशक्ती संत मुक्ताई या चारही भावंडांनी जगाचा उद्धार करण्याचे काम केले. मुक्ताईंचे बंधूप्रेम संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. हेच बंधूप्रेम सातशे वर्षानंतरही जपण्याचे काम रक्षाबंधनाच्या पार्श्‍वभूमीवर केले जात आहे.

भाऊ-बहिणीचे नाते जगासाठी प्रेरक व मार्गदर्शक
गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही विश्‍वस्त हभप शारंगधर महाराज यांनी दिलेल्या सूचनेनुसार कोरोनाचा काळ असल्याने भागवत चौधरी, अनंत महाजन व गजानन कुळकर्णी यांनी श्री क्षेत्र आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर येथे श्री संत निवृत्तीनाथ महाराज आणि श्रीक्षेत्र सासवड येथे श्री संत सोपानदेव महाराज यांना राखी अर्पण केली. सासवड येथे पुजारी गोस्वामी व शिंदे तर आळंदी येथे भीमाशंकर वाघमारे उपस्थित होते. याबाबत हभप शारंगधर महाराज यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मुक्ताई व ज्ञानेश्‍वर यांचे भाऊ-बहिणीचे नाते संपूर्ण जगासाठी प्रेरक व मार्गदर्शक आहे. रक्षाबंधनाच्या माध्यमातून भावा-बहिणीतील प्रेमाचे अतूट बंधन जोपासण्याचे काम करण्यात येत आहे. ही परंपरा याहीपुढे निरंतर सुरू ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अध्यात्माची परमोच्च पातळी गाठलेल्या बहिणी-भावाच्या प्रेमाची आठवण आजही रक्षाबंधनाच्या माध्यमातून जोपासली जात आहे. राखी पाठवून आजही संत मुक्ताई आपल्या तीनही दादांना राखी पाठवत असल्याची परंपरा उल्लेखनीय आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !