रक्षाबंधन आटोपून घराकडे परतणार्‍या तरुणाचा अपघाती मृत्यू


जळगावात विद्यापीठाच्या प्रवेशव्दारासमोर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक

जळगाव : काकांकडे रक्षाबंधन आटोपून पुन्हा आपल्या गावी परतणार्‍या तरुणाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासमोर महामार्गावर मंगळवारी दुपारी तीन वाजता घडली. अजय युवराज मनोरे (40, रा.रत्नापिंप्री) असे मयत युवकाचे नाव आहे.

रत्नापिंप्री गावात हळहळ
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, रक्षाबंधन साजरा करण्यासाठी अजय मनोरे हा त्याच्या दुचाकीने दोन दिवसांपूर्वी जळगाव शहरातील अयोध्यानगरात असलेल्या कांकाच्या घरी आला होता. मंगळवारी दुपारी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आटोपल्यावर अजय हा दुचाकीने आपल्या गावी रत्नाप्रिंपी जाण्यासाठी निघाला. यादरम्यान विद्यापीठासमोर अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ये-जा करणार्‍या वाहनधारकांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. तसेच जखमी तरुणाकडे असलेल्या मोबाईलमधील संपर्क क्रमांकावर संपर्क साधून त्याच्या मोठ्या भावाला घटनेची माहिती दिली. माहिती मिळाल्यावर अजय याचा मोठा भाऊ सचिन याने जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. तोपर्यत अजयची प्राणज्योत मालवली होती. जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीत कार्यरत एमआयडीसी पोलिस ठाण्याचे शिवदास चौधरी व राजेंद्र ठाकरे यांनी पंचनामा केला तसेच शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !