सायबर सुरक्षेचा जागर : साईकृपा इरिगेशन फॅक्टरीत प्रभावी इम्पॅक्ट सेशन

ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, ओटीपी व बनावट क्यूआर कोडपासून बचावासाठी मार्गदर्शन; सुरक्षित डिजिटल जीवनशैलीचा संकल्प


धरणगाव (गुरुवार, 9 सप्टेंबर 2026) : साईकृपा इरिगेशन फॅक्टरी, धरणगाव येथे बुधवार, 9 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 2.40 वाजता सायबर सुरक्षा जनजागृती विषयावर विशेष इम्पॅक्ट सेशन व इम्पॅक्ट अ‍ॅक्टिव्हिटीचे आयोजन करण्यात आले. वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर डिजिटल व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत उपस्थितांना उपयुक्त व महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.

या विशेष सत्रात प्रियदर्शनी भांडारकर व खुशबू लांबोळे यांनी उपस्थितांना सायबर सुरक्षेच्या विविध पैलूंची माहिती दिली. दैनंदिन जीवनात मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया तसेच ऑनलाईन आर्थिक व्यवहारांचा वाढता वापर लक्षात घेता डिजिटल सुरक्षितता ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

फिशिंगपासून क्यूआर कोड स्कॅमपर्यंत विविध विषयांवर मार्गदर्शन
सत्रादरम्यान ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, विशिंग, स्मिशिंग, ओटीपीची सुरक्षितता, पासवर्ड व्यवस्थापन आणि मजबूत पासवर्ड तयार करण्याचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली तसेच खात्यांची सुरक्षितता वाढविण्यासाठी द्विस्तरीय प्रमाणीकरण वापरण्याचे महत्त्वही समजावून सांगण्यात आले.

सोशल मीडियाचा वापर करताना वैयक्तिक माहिती सार्वजनिक न करणे, अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या संदेशांना अथवा लिंकला प्रतिसाद न देणे, बनावट लिंक, क्यूआर कोड आणि विविध प्रकारच्या ऑनलाइन स्कॅमपासून सावध राहणे, याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

सायबर बुलिंग व डिजिटल गोपनीयतेवरही भर
या वेळी सायबर बुलिंग, डिजिटल गोपनीयता, अज्ञात व्यक्तींशी ऑनलाइन संपर्क टाळणे तसेच मोबाईलमध्ये विविध प्लिकेशन्स डाउनलोड करताना आवश्यक सुरक्षा खबरदारी घेण्याबाबत माहिती देण्यात आली. कोणतेही अ‍ॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची विश्वसनीयता तपासणे, अनावश्यक परवानग्या देणे टाळणे आणि संशयास्पद डिजिटल व्यवहारांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले. सायबर गुन्ह्यांना बळी पडू नये यासाठी सतर्कता, माहितीची पडताळणी आणि डिजिटल शिस्त या तीन बाबी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

प्रश्नोत्तरातून वाढली सायबर सुरक्षेची जाणीव
संवादात्मक आणि प्रभावी पद्धतीने घेण्यात आलेल्या या इम्पॅक्ट सेशन व क्टिव्हिटीला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सहभागी व्यक्तींनी सायबर सुरक्षा, ऑनलाईन व्यवहार आणि डिजिटल फसवणुकीशी संबंधित विविध प्रश्न विचारून त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.

सत्राच्या माध्यमातून उपस्थितांमध्ये डिजिटल सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण झाली. तसेच ऑनलाईन व्यवहार करताना अधिक सतर्क राहण्याचा आणि सुरक्षित डिजिटल जीवनशैलीचा अवलंब करण्याचा संकल्प सहभागी व्यक्तींनी केला. या उपक्रमासाठी साईकृपा इरिगेशन फॅक्टरी, धरणगाव येथील उपस्थितांचे तसेच संबंधित सर्व सहकार्‍यांचे मोलाचे सहकार्य लाभले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !