भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात इलेक्ट्रो ब्लॉक्स’ विषयावर आयआयटी, मुंबईतर्फे कार्यशाळा


भुसावळ (गुरुवार, 9 सप्टेंबर 2026) : शहरातील के.नारखेडे विद्यालयात फोसी आयआयटी, मुंबईय यांच्यातर्फे स्किल बेस्ड डेव्हलपमेंट आणि स्कूल इनोव्हेशन प्रोग्राम अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी कोडींग व इलेक्ट्रॉनिक्स यावर आधारित इलेक्ट्रो ब्लॉक्स या तंत्रज्ञान विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

सध्याच्या काळात इलेक्ट्रॉनिक उपकरणांची रचना आणि त्यांची सुरक्षितता यामध्ये षइलेक्ट्रो बॉक्सेस’ किंवा इलेक्ट्रॉनिक एन्क्लोजर्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या मार्गदर्शन सत्रात आयआयटी मुंबई येथील तज्ज्ञ प्रा.प्रतीक भोसले व इतर प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना जवळपासच्या परिसरातील समस्या व अडचणींवर विचार करून नवनिर्मिती करावी, असे प्रतिपादन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना ब्लिंक ऑफ एलईडी, कंट्रोल एलईडी विथ पुश बटन यापासून आरडीनो युनो व कोडिंग इत्यादी प्रोग्राम रन करून दाखवले. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः संगणकावर वेगवेगळे प्रोग्राम्स रन करून रोबोटिक्सच्या उपकरणांची माहिती घेतली.

भविष्यातील रोजगाराच्या संधीवरही मार्गदर्शन
इलेक्ट्रो बॉक्सेसचे प्रकार, त्यांचे औद्योगिक क्षेत्रातील उपयोजन सर्किट डिझायनिंगमधील त्यांचे महत्त्व आणि थर्मल मॅनेजमेंट तांत्रिक मुद्यांवर सविस्तर प्रकाश टाकला. भविष्यात या क्षेत्रात असणार्‍या रोजगाराच्या आणि स्टार्टअपच्या संधींबद्दलही त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी नीलिमा वसंत वारके मुंबई यांनी कार्यशाळेच्या आयोजनासाठी विशेष मार्गदर्शन केले. यावेळी विद्यालयाचे विज्ञान शिक्षक नितीन जनार्दन पाटील यांनी रोबोटिक्स इनोव्हेशन यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

तंत्रज्ञानाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत दिशादर्शक आणि फायदेशीर आहे व विद्यार्थ्यांनी त्याचा उपयोग करून नाविन्यपूर्ण निर्मिती करावी, असे आवाहन विद्यालयाचे उपमुख्याध्यापक एस.पी.पाठक यांनी केले.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमास विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अ‍ॅड.संगीता अडकमोल, पर्यवेक्षक एस.एल.राणे, बी.बी.जोगी, ज्येष्ठ विज्ञान शिक्षक एस.एस. कापसे यांची उपस्थिती लाभली. या कार्यशाळेचे आयोजन व व्यवस्थापन एन.जे.पाटील, सहाय्यक निशा जावळे यांनी केले. या कार्यशाळेचे सर्व संगणकीय व्यवस्थापन व मार्गदर्शन संगणक विभागप्रमुख बी.ए.पाटील व सारिका भारंबे यांनी केले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !