लोकसेवा हक्क कायद्याची योग्य व प्रभावीपणे अंमलबजावणी करावी : आयुक्त चित्रा कुलकर्णी
जळगाव जिल्हास्तरीय आढावा बैठकीत विभागप्रमुखांना मार्गदर्शन
जळगाव (गुरुवार, 10 सप्टेंबर 2026) : नागरिकांना आवश्यक शासकीय सेवा विहित मुदतीत, सुलभ व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देणे हा लोकसेवा हक्क कायद्याचा मुख्य उद्देश असून त्यादृष्टीने सर्व विभागांनी नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी समन्वयाने व सकारात्मक दृष्टिकोनातून कार्य करावे व लोकसेवा हक्क कायद्याची योग्य व प्रभावीपणे अंमलबजावणी करावी , असे प्रतिपादन राज्य लोकसेवा हक्क आयोग नाशिक विभागाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी केले.
जळगावात जिल्हास्तरीय आढावा बैठक
आयुक्त चित्रा कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात राज्य लोकसेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीबाबत जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीत जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाज तसेच लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार्या सेवांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यांची होती उपस्थिती
या बैठकीस जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, मनपा आयुक्त आदित्य जीवने, उपविभागीय अधिकारी योगेश कुमार मीना, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपवनसंरक्षक सौरीश सहाय, आयोगाचे अवर सचिव उदय काण्णव,अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, नायब तहसीलदार प्रशांत पोतदार यांच्यासह जिल्हास्तरीय सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. तसेच तालुकास्तरीय उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि नगरपरिषदांचे मुख्याधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीस सहभागी झाले होते.
नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून द्या
आयुक्त चित्रा कुलकर्णी म्हणाल्या, सर्व विभागांनी सेवा हक्क संदर्भातील कामकाजाचा नियमित आढावा घेऊन कायद्यातील सर्व तरतुदींचा अभ्यास करावा तसेच या संबंधित अधिकारी कर्मचारी यांना आवश्यक प्रशिक्षण द्यावे. नागरिकांच्या अर्जामध्ये काही त्रृटी असल्यास याबाबत अर्जदारांना वेळेत अवगत करावे. नागरिकांचा परिपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यावर विहित मुदतीत कार्यवाही करून नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून द्यावी, असे त्यांनी सांगितले.
अर्ज प्रलंबित ठेवू नका
नागरिकांनी विविध सेवा मिळण्यासाठी केलेले अर्ज प्रलंबित ठेवू नका, सर्व विभागाच्या प्रमुखांनी नियमित अर्ज व अपिल अर्ज वेळेत निकाली काढावे. अपील अर्जा संबंधात दक्षता घ्यावी अशा सुचना त्यांनी दिल्या. नागरिकांना वेळेत व सुलभ सेवा मिळण्यासाठी लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी अधिक गतिमान व नागरिकाभिमुख पद्धतीने करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच विविध विभागप्रमुखांनी मांडलेल्या अडचणींवर आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. लोकसेवा हक्क कायद्यासंदर्भात जळगाव जिल्हाचे कामकाज उत्कृष्ट पद्धतीने सुरु असल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.
लोकसेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीचा आढावा
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जिल्ह्यातील लोकसेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीचा आढावा सादर केला. यावेळी त्यांनी सेवा हक्क कायद्याच्या अमंलबजावणी संदर्भात सुरु असलेल्या सेवादूत प्रणाली एआय आधारित नागरिकांचे अभिप्राय प्रणाली संदर्भात माहिती दिली. जिल्ह्यात 38 विभागांच्या 1212 प्रकारच्या सेवा सुरु असून ‘आपले सरकार’ पोर्टल तसेच विविध सेवा ऑनलाइन प्रणालींद्वारे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सेवा हक्क कायद्याच्या संदर्भात जिल्ह्यात नागरिकांना प्रभावीपणे व वेळेत सेवा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.

