मोर धरण परीसरात फिरणार्या पर्यटकांवर होणार कारवाई
यावल : तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या मोर धरण क्षेत्रात मागील काही दिवसांपासून पर्यटनाचा भाग म्हणून जळगाव जिल्ह्यातील नागरीकांची मोठी गर्दी होत आहे मात्र या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती असल्याने शिवाय नियमांचे उल्लंघण होत असल्याने यापुढे धरणावर गर्दी करणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी दिले आहेत.
धरणाचे मार्ग बंद करण्याचे आदेश
प्रांताधिकारी अजित थोरबोले यांनी महसूल प्रशासनास 3 सप्टेंबर रोजी पाठवलेल्या आदेशपत्रात म्हटले आहे की, सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यात उद्भवलेल्या कोवीड 19 कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 हा 31 मार्च 2020 पासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे. यावल तालुक्यातील हिंगोणा गावाजवळ सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेले मोर प्रकल्प धरण या ठिकाणी मागील काही दिवसांपासून या धरणावर रविवार या सुटीच्या दिवशी परीसरातून आणि जळगाव जिल्ह्यातून मोठया प्रमाणावर धरणावर पर्यटकांची गर्दी होत असल्याने या गर्दीमुळे कोरोना विषाणुसंसर्ग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघण होत असल्याने या गोंधळामुळे संसर्ग वाढीला लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रांताधिकार्यांनी मोर प्रकल्प धरणास प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषीत केले आहे. या संदर्भात धरणाकडे जाणारे सर्व मार्ग तत्काळ बंद करावेत व या मार्गाने कायदा मोडुन मोटार वाहनांनी जाणार्यांवर मोटर वाहन अधिनियम कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, असे आदेश प्रशासनास दिले आहेत.


