भुसावळात एकावर चाकूहल्ला : पसार आरोपीला अटक
भुसावळ : अमळनेरातील तक्रारदारावर भुसावळात किरकोळ कारणावरून चाकूहल्ला करण्यात आल्याची घटना 18 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता शहरातील इराणी मशिदीसमोर घडली होती. या गुन्ह्यातील पसार आरोपी मोहम्मद अली लियाकत अली (28, रा.ईराणी मोहल्ला, भुसावळ) यास बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे अटक केली आहे. दरम्यान, आरोपीला 4 रोजी भुसावळ न्यायालयात हजर केले असता त्यास 7 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला अटक
शहरातील इराणी मोहल्ल्यात 18 रोजी दुपारी साडेतीन वाजता तक्रारदार मुकदरअली सलीमअली जाफरी (40, रा.ख्वाजा नगर, अमळनेर) हे भुसावळ येथील ईराणी मशिदीतुन नमाज पडुन बाहेर आल्यानंतर आरोपी मोहम्मद अली लियाकत अली याने अमळनेर येथील अक्तार अली मनोहर अली यांच्याशी भांडण का केले व तु त्यांच्यांशी वाद का घातला, तु अक्तर अली से झगडा करेंगा तो मे तुम्हे जिंदा नही छोडुंगा, असे बोलुन आरोपीने आपल्याजवळील चाकूने तक्रारदाराच्या खांद्यावर, उजव्या बाजूला पोटावर वार करून त्यांना जीवे ठारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध 20 रोजी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तो पसार झाला होता. 2 रोजी आरोपी रेल्वेने पळून जाण्याच्या तयारीत त्यास अटक करण्यात आली. ही कारर्वा पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, नाईक रवींद्र बिर्हाडे, समाधान पाटील, किशोर महाजन, रमण सुरळकर, महेश चौधरी, कृष्णा देशमुख, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, बंटी कापडणे, होमगार्ड गौरव शाक्या, रवींद्र वरणकर आदींनी केली. तपास सहा.निरीक्षक अनिल मोरे करीत आहेत.


