भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीतही खडसेंना संधी नाहीच !
विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांना मात्र ‘मानाचे पान’
मुंबई : भारतीय जनता पक्षाची नूतन राष्ट्रीय कार्यकारीणी शनिवारी जाहीर करण्यात आली मात्र त्यात पुन्हा भाजपावर नाराज असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसेंना डावलण्यात आले आहे तर दुसरीकडे गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षात काहीसे डावलले गेलेले विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांना अखेर पक्षाने मानाचे पान दिले आहे. विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांनी भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये राष्ट्रीय सचिव म्हणून निवड केली आहे. तावडे आणि मुंडेसोबतच विजया रहाटकर, सुनील देवधर यांना राष्ट्रीय सचिव म्हणून कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे.
महाराष्ट्रातून आठ जणांना संधी
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील आठ जणांना संधी देण्यात आली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमधील या नव्या नियुक्त्यांची घोषणा केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रामधून राष्ट्रीय सहसरचटणीस म्हणून व्ही. सतीश, राष्ट्रीय सचिव म्हणून विनोद तावडे, सुनील देवधर, पंकजा मुंडे, विजया रहाटकर, राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून संजू वर्मा, हिना गावीत आणि अल्पसंख्याक मोर्चासाठी जमाल सिद्दीकी यांची निवड जाहीर करण्यात आली. दरम्यान, त्याबरोबरच विशेष उल्लेखनीय नियुक्त्यांमध्ये कर्नाटकमधील युवा खासदार तेजस्वी सूर्या यांची भाजपाच्या युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तसेच आयटी आणि सोशल मीडियाची जबाबदारी अमित मालवीय यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.


खडसेंच्या भूमिकेकडे लागले लक्ष
मागील विधानसभा निवडणुकीत भाजपानेएकनाथ खडसे यांचे तिकीट कापले, त्यामुळे खडसे नाराज होत, मात्र एकनाथ खडसेंना मोठी जबाबदारी मिळणार आहे, असं सांगत भाजपा नेत्यांनी त्यांची नाराजी दूर केली परंतु विधानसभा निवडणुका होऊन एक वर्ष झाला तरी एकनाथ खडसेंना पक्षाने कोणतीही जबाबदारी दिली नाही त्यामुळे खडसेंच्या आगामी भूमिकेकडे लक्ष लागले आहे.