सुडाच्या राजकारणाचे आजही भोगतोय परीणाम : माजी मंत्री खडसे
जळगाव : माझ्या विरोधात अंजली दमानिया यांनी मुंबईत विनयभंगाची खोटी तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा मुक्ताईनगरात घडल्याचे दाखवून मुंबईत गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे हा गुन्हा दाखल करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितले होते. मी त्यांना विचारल्यावर हे मान्य करीत हा गुन्हा मागे घेऊ , असेही त्यांनीच सांगितले होते. आजही मी त्या गुन्ह्याच्या तारखेसाठी जात आहे, असे खडसे यांनी सांगत सुडाच्या राजकारणाचे परीणाम आजही भोगत असल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे येथे म्हणाले. अॅड.विजय पाटील यांनी माजी मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केल्यानंतर माजी मंत्री महाजन यांनी पत्रकार परीषद घेत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे नाव न घेता आरोप केले होते. त्यावर खडसेंनी शनिवारी प्रत्युत्तर दिले आहे.
सुडाच्या राजकारणाचा सूत्रधार सर्वांनाच ठावूक
खडसे म्हणाले की, भंगाळेसारख्या एका साध्या व्यक्तीने माझ्यावर गुन्हा दाखल केला. त्यांच्या पाठीमागे कोण होते, हे सर्वानाच माहीत आहे. एक नव्हे आपल्यावर 11 गुन्हे दाखल आहेत. त्यावेळी सुडाचे राजकारण कोण करीत होते, हे सर्वानाच माहिती आहे. त्या राजकारणाचा मी बळी ठरलो आहे, असे खडसे यांनी स्पष्ट केले.


