अवकाळीग्रस्त शेतकर्‍यांना मोठा दिलासा : जळगाव जिल्ह्यासाठी 14.50 कोटींची मदत मंजूर

जळगाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश


Major relief for farmers affected by unseasonal rain: ₹14.50 crore aid sanctioned for Jalgaon district जळगाव (25 जून 2026) : एप्रिल 2026 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. जळगाव जिल्ह्यासाठी तब्बल 14 कोटी 50 लाख 89 हजार रुपये मदत मंजूर करण्यात आली आहे. राज्य शासनाने 25 जून 2026 रोजी (काल) यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला असून जळगाव जिल्ह्यातील 14 हजार 360 बाधित शेतकरी आणि 7 हजार 934 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान या मदतीत समाविष्ट करण्यात आले आहे.

पालकमंत्र्यांचा पाठपुरावा मोलाचा
या निर्णयामागे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, आमदार अमोल जावळे, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह इतर आमदारांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा महत्त्वाचा ठरला. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती प्राप्त होताच पालकमंत्री पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला तातडीने पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री यांच्याकडे वेळोवेळी बैठका व पत्रव्यवहार करून जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांना तातडीची मदत देण्याची मागणी लावून धरली होती.



राज्यात 106 कोटींच्या मदतीला मंजुरी
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल विभाग, कृषी विभागाने शासनाकडे नुकसान अहवाल सादर केला होता. त्याला यश मिळत राज्य शासनाने राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी एकूण 106 कोटी 56 लाख 48 हजार रुपयांच्या मदतीस मंजुरी दिली आहे. जळगाव जिल्ह्यासाठी तब्बल 14 कोटी 50 लाख 89 हजार रुपये मदत मंजुर करण्यात आली.

भरपाईची शेती कामांसाठी होणार मदत : पालकमंत्री
अवकाळी पावसामुळे माहे एप्रिल व मे महिन्यात जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यांना तातडीची मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री, कृषिमंत्री आणि संबंधित विभागांकडे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आ.चंद्रकांत पाटील, आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे, आ.अमोल जावळे, आ.मंगेश चव्हाण यांच्यासह त्या-त्या भागातील आमदारांच्या सहकार्याने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. या संदर्भात कृषिमंत्री व मुख्यमंत्री यांच्याकडे बैठका देखील झाल्या. शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्याने खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांना दिलासा मिळणार असून शेतीच्या पुढील कामांसाठीही मदत होणार आहे. मंजूर निधी थेट शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार असून प्रशासनाने त्यासाठी आवश्यक कार्यवाही गतीने करावी, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !