रावेरात मका खरेदी बंदमुळे शेतकरी संतप्त
रावेर : रावेर तालुक्यात उद्दिष्ट संपल्याने मका खरेदी बंद करण्यात आल्याने शेतकर्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. आतपर्यंत 123 शेतकर्यांकडील एक कोटी दोन लाख 34 हजार 200 रुपये किंमतीचा पाच हजार 532 क्विंटल मका खरेदी करण्यात आला आहे. ज्वारी व मका विक्रीसाठी एक हजार 170 शेतकर्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. दरम्यान, अद्याप 962 शेतकर्यांकडील मक्याची खरेदी बाकी असताना खरेदी केंद्र बंद करण्यात आल्याने शेतकर्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या संदर्भात तहसीलदार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. यंदा तालुक्यात मक्याचे उत्पादन अधिक आहे. आधीच भर दिवाळीत खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकर्यांमध्ये नाराजी होती. त्यातच एक हजार 170 शेतकर्यांनी मका व ज्वारी विक्रीसाठी नाव नोंदले होते. त्यापैकी फक्त 123 शेतकर्यांकडील मक्याची खरेदी होवू शकली तर सुमारे 962 शेतकर्यांकडे मका शिल्लक असल्याने त्यांच्यात संतापात भावना आहे.
ज्वारीची खरेदी सुरू
रावेर येथील खरेदी केंद्रावर अद्याप ज्वारी खरेदी सुरू आहे. आतापर्यंत 85 शेतकर्यांकडील 48 लाख 47 हजार रुपयांचा एक हजार 850 क्विंटल मका खरेदी करण्यात आला आहे. त्याासाठी शासनाने प्रती क्विंटल दोन हजार 620 रुपये भाव निश्चित केला आहे.


