अमळनेरात चोरट्याचा धिंगाणा : पकडणार्याचे बोटच तोडले
अमळनेर (शनिवार, 5 सप्टेंबर 2026) : अमळनेर शहरातील मातोश्री नगर परिसरात, चामुंडा माता मंदिराजवळ बांधकाम साहित्याची चोरी करणार्याला नागरिकांपैकी एकाने पकडले असता आरोपीने बोटाचा चावा घेत चक्क बोटच तोडले व पळ काढला. ही घटना 2 रोजी सकाळी सुमारे सहा वाजेच्या सुमारास घडली.
काय आहे प्रकरण
मातोश्री नगर परिसरातील चामुंडा माता मंदिराजवळ सुरू असलेल्या बांधकामाच्या घरात एक व्यक्ती बांधकाम साहित्य घेऊन जात असल्याचे विजय बडगुजर व रमेश पाटील बाबा यांच्या निदर्शनास आले. त्याला हटकले असता त्याने मला मिस्तरी ने पाठवले, असे संशयीताने सांगितले. संशयीताला ताब्यात घेतल्यानंतर झटापटीत संशयिताने विजय बडगुजर यांच्या हाताच्या बोटाला चावा घेतल्याने त्यांच्या बोटाचा तुकडा पडला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. चोरट्याजवळ धारदार कोयता व सायकल होती तसेच त्याच्याकडे बांधकामाचे साहित्यही होते.

पोलीस येण्यापूर्वीच संशयीत पसार
घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली मात्र त्या दरम्यान चोरट्यानी विष्ठा अंगावर फेकण्याची धमकी देत पळ काढला. हेड कॉन्स्टेबल सुनील तेली व विनोद संदानशीव यांनी धाव घेतली. जखमी विजय बडगुजर यांच्यावर धुळे येथे तातडीने वैद्यकीय उपचार करण्यात आले. संशयीत आलम नगरातील रहिवासी असून त्याच्या मागावर पोलीस असल्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम म्हणाले.

