प्रेमासाठी पतीला सोडले ; पतीने मात्र वचन निभावले


जबलपूरच्या विवाहितेच्या फेसबुकवरून जुळल्या गाठी : पोलिसांच्या सतर्कतेने विवाहिता परतली स्वगृही

भुसावळ : सप्तपदीच्या सात फेर्‍यांसोबत सात-जन्म एकमेकांशी प्रामाणिक राहून नेहमीच सुख-दुःखात साथ देण्याची शपथ घेतलेल्या दाम्पत्याचा सुखाने संसार सुरू असतानाच त्यांच्या संसारवेलीवर दोन गोंडस फुले उमलतात. संसाराचा रहाटगाडा सुरू असतानाच 30 वर्षीय विवाहितेच्या जीवनात एका तरुणाची सोशल मिडीयावरून मैत्री होते व हळूहळू दोघांमध्ये प्रेम वाढल्यानंतर एक दिवस विवाहिता मुलाला पतीकडे सोडून दुसर्‍या तान्हुल्या मुलाला सोबत घेत त्या तरुणासोबत रफू चक्कर होते तर दुसरीकडे पत्नीच्या चिंतेत व्याकुळ झालेला पती पोलिसात धाव घेवून पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवतो. तांत्रिक विश्‍लेषणावरून विवाहिता आपल्या प्रियकरासोबत भुसावळत असल्याचे कळताच पोलिस यंत्रणाही आपले कर्तव्य चोखपणे बजावते व हरवलेली विवाहिता सापडल्यानंतर तिला जबलपूर पोलिसांच्या उपस्थितीत पतीकडे सुपूर्द केले जाते. एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला साजेशी घटना भुसावळात घडली.

पतीचा अंदाज निघाला खरा
जबलपूरच्या 30 वर्षीय विवाहितेला दोन अपत्य असून सोशल मिडीयावरून तिची भुसावळस्थित बँकेत नोकरी करणार्‍या युवकाशी मैत्री झाली व प्रेमात रूपांतर झाले. दोन वर्षांपूर्वी पत्नी सोशल मिडीयावर चॅटींग करताना पतीला आढळल्यानंतर त्याने तिला सुधारणा करण्याबाबत समज दिली मात्र प्रेमात आकंठ बुडालेल्या विवाहितेने प्रेमासाठी आपल्या पतीला सोडण्याची तयारी दर्शवत शुक्रवार, 18 डिसेंबर रोजी जबलपूरातून प्रियकरासोबत चारचाकीने भुसावळ गाठले. घरी विवाहिता नसल्याने चिंतेत व्याकुळ पतीने पत्नी हरवल्याची जबलपूर पोलिसात नोंद केली. जबलपूर पोलिस अधीक्षकांनी या संदर्भात जळगाव अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्याशी घडल्या प्रकाराची माहिती कळवल्यानंतर बाजारपेठ पोलिसांना सूचना करण्यात आल्या.


एक वर्षीय बालकाला घेवून गाठले भुसावळ
भुसावळातील तरुणाने चारचाकीद्वारे त्या विवाहितेला भुसावळात आणले व सोबत विवाहिता एक वर्षीय बाळालादेखील घेवून आली तर दुसर्‍या मुलाला पतीकडेच सोडले. दुसरीकडे जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनानंतर बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी श्रीकृष्ण देशमुख व चेतन ढाकणे यांनी विवाहिता व तिच्या प्रियकराच्या शोधार्थ भुसावळातील सर्व लॉज पालथ्या घातल्यानंतर एका लॉजमध्ये दोघे आढळल्यानंतर जबलपूर पोलिसांना सूचित करण्यात आले.

पतीने मात्र वचन निभावले
विवाहिता पतीच्या घरून मोठ्या प्रमाणावर दागिनेदेखील निघाल्याची माहिती असल्याने तिच्या पर्समध्ये ते तपासून जबलपूर पोलिसांना माहिती कळवण्यात आली शिवाय महिलेस ताब्यात घेतल्यानंतर बाजारपेठ पोलिसात आणण्यात आले. रविवारी सकाळी 11 वाजता बलपूर पोलिस व महिलेचा पती, नातेवाईक यांंना महिलेचा कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून ताबा देण्यात आला. प्रसंगी बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, हवालदार जयराम खोपडे, रवींद्र तायडे, श्रीकृष्ण देशमुख, चेतन ढाकणे आदींची उपस्थिती होती.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !