मका खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणार : आमदार शिरीष चौधरी
रावेर : रावेरात शासकीय मका खरेदी केंद्र शासनाच्या उद्दिष्ट पूर्तीमुळे बंद करण्यात आले असलेतरी 962 शेतकर्यांकडील मक्याची अद्याप खरेदी झाली नसल्याने पुन्हा बंद झालेले मका खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले. खरेदी केंद्रावर आतापर्यंत 123 शेतकर्यांची एक कोटी दोन लाख 34 हजार 200 रुपयांचा पाच हजार 532 क्विंटल मका खरेदी करण्यात आला आहे. ज्वारी व मका विक्रीसाठी एक हजार 170 शेतकर्यांनी नंबर लावला होता. तब्बल 962 शेतकरी बाकी असतांना शासनाने निर्णय घेत खरेदी बंद केले आहे. आधीच भर दिवाळीत खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकर्यांमध्ये नाराजी होती. त्यातच एक हजार 170 शेतकर्यांनी मका व ज्वारी विक्रीसाठी नाव नोंदले होते. त्यापैकी अवघ्या 123 शेतकर्यांकडील मका खरेदी होऊ शकला मात्र 962 शेतकरी अद्यापही खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत.

