यावल न्यायालयाची फसवणूक : दोघे जाळ्यात
आरोपी नाशिक शहरातील रहिवासी : यावल न्यायालयाने आरोपींना सुनावली दोन दिवसांची पोलिस कोठडी
यावल : खुनाच्या आरोपात तुरूंगात असलेल्या साथीदारांना जामीन मिळवण्यासाठी अस्तित्वात नसलेल्या शेती क्षेत्राव्दारे ऐपतीचे (सॉल्व्हन्सी) दोन खोटे दाखले तयार करून न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील दोघा भामट्याच्या तब्बल साडेतीन वर्षांनंतर यावल पोलिसांनी नाशिकमधून मुसक्या आवळल्या आहेत. ज्ञानेश्वर शामराव पवार (रा.मातंग वाडा, नाशिक) व प्रतीम अप्पासाहेब चांगले (रा.पंचवटी, नाशिक) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
खोट्या सॉल्व्हन्सीचा दिला दाखल
आरोपींनी एप्रिल 2017 मध्ये नाशिक न्यायालयात यावल तहसील कार्यालयातील खोटे ऐपतीचे दाखले सादर केले म्हणून यावल पोलिसात गुन्हा दाखल होता. 5 जानेवारी 2014 रोजी नाशिक सचिन उर्फ डाण्या रावसाहेब मोकळ याचा खून झाला होता. या खून प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली होती. चौघांपैकी श्रीराम सुकलाल सपकाळे (रा.पिंप्राळा, जळगाव) याने निमगाव, ता.यावल शेत गट क्र.252 (अस्तित्वात नाही) खोटे दाखवून यावल निवासी नायब तहसीलदार एन. ढगे यांची खोटी स्वाक्षरी व बनावट शिक्के, बनावट जावक क्रमांक टाकुन खोटे ऐपतदार (सॉल्व्हन्सी) दाखला तयार केला तसेच याच खुनातील दुसरा संशयीत आरोपी ज्ञानेश्वर शामराव पवार (रा.मातंग वाडा, नाशिक) याने अंजाळे, ता. यावल शेत गट क्रमांक 21 (अस्तित्वात नाही) यावर खोटा सॉल्व्हन्सी दाखला सादर केला. या दस्तावेजाच्या आधारे नाशिकच्या अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अॅड.व्ही.आर.गुंजाळ यांनी सादर केल्यानंतर खुनातील संशयीत आरोपी योगेश दादा गांगुर्डे (रा.जगतापवाडी, सातपूर, नाशिक) व प्रतीम अप्पासाहेब चांगले (रा.गणेश वाडी, नाशिक) यांना जामिनावर मुक्त करण्यात आले होते. अस्तित्वात नसलेले शेतीक्षेत्र दाखवून खोटे ऐपतदार दाखले तयार करून न्यायालयाची व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी यावलचे निवासी नायब तहसीलदार आप्पासाहेब व्हनकडे यांनी यावल पोलिसात फिर्यादी दिल्यावरून पाचही आरोपींविरुद्ध 13 एप्रिल 2017 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयीत आरोपी पसार झाले होते.

गोपनीय माहितीवरून आवळल्या मुसक्या
यावल पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांना आरोपींबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरणार, राजेश वाढे, भूषण चव्हाण, सागर पाठक यांना आरोपींच्या अटकेसाठी रवाना केले तसेच नाशिकच्या गुन्हे अन्वेषण विभागाची त्यासाठी मदत घेण्यात आली. ज्ञानेश्वर शामराव पवार (मातंग वाडा, नाशिक) व प्रतीम अप्पासाहेब चांगले (रा.पंचवटी, नाशिक) यांना अटक करण्यात आल्यानंतर रविवारी येथील सहदिवाणी न्यायालयात न्या.एम.एस.बनचरे यांच्या न्यायालयात हजर केले असता या दोघांना 22 डिसेंबरपर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अधिक तपास पोेलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरणार करीत आहे.

