भुसावळात आयशर अपघात : मयत तरुण युपीचा रहिवासी
भुसावळ : शहरातील काच बंगल्याजवळ आयशर वाहनाने धडक दिल्याने 35 वर्षीय अनोळखी युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली होती. सुरुवातीला अनोळखी तरुणाची ओळख पटली नव्हती मात्र मयताच्या खिशातील पाकिटात असलेल्या सीम कार्डातील क्रमांकावर शहर पोलिसांनी संपर्क साधल्यानंतर त्याची ओळख पटली. गोविंद हरीभजन (25, उत्तरप्रदेश) असे मयताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आयशरचा धक्का अन् जागीच मृत्यू
राजेंद्र वसंत पाटील (39, उधना, सुरत) हा चालक नागपूरकडे केमिकल घेऊन आयशर ट्रक (क्रमांक एम.एच.18-बी.ए.0629) ने जात होता मात्र औषधी घेण्यासाठी शहराकडे वळला मात्र शहरात येत असताना काच बंगल्याजवळ गोविंदला आयशरचा धक्का लागला व तो वाहनाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघात प्रकरणी आयशर चालक राजेंद्र वसंत पाटील (39, उधना, सुरत) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यास अटक करण्यात आली होती तर सोमवारी त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. दरम्यान, मयत गोविंद हरीभतन कामाच्या शोधार्थ युपीतून शहरात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तपास शहर पोलिस ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक संदीप दुणगहू करीत आहेत.


