भुसावळात अखेरच्या क्षणी भरड धान्य खरेदी


भुसावळात प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे भरडधान्य खरेदी लांबली : आठ दिवस शिल्लक असताना खेरदीचा शुभारंभ

भुसावळ : प्रशासकीय काम अन् बारा महिने थांबचा प्रत्यय भुसावळकरांना भरडधान्य खरेदीबाबत आला. खरेदी केंद्र बंद होण्यास अवघा आठ ते नऊ दिवसांचा अवधी शिल्लक असताना भुसावळात भरडधान्य खरेदी केंद्राला मुहूर्त गवसला मात्र या कालावधीत शेतकर्‍यांकडील ज्वारीची मोजणी होणार कशी? असा प्रश्‍न असून मक्याप्रमाणेच उद्दिष्ट पूर्ण होवून खरेदी लांबल्यास करावयाचे काय? असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. केवळ गोदाम उपलब्ध नसल्याने खरेदी लांबल्याने प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा प्रत्यय येथे शेतकर्‍यांना आला.

भरडधान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन
मंगळवार, 22 रोजी यावल रोडवरील शासकीय गोदामात आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते भरधान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ झाला. मुदत संपण्यासाठी केवळ नऊ दिवसांचा कालावधी शिल्लक असताना उद्घाटन झाले असून उद्दिष्टपूर्तीमुळे खरेदी बंद करण्यात आली असून आता या केंद्रावर केवळ ज्वारीची खरेदी होणार आहे. वास्तविक 1 नोव्हेंबरला केंद्र सुरू होणे अपेक्षीत होते मात्र गोदामाअभावी खरेदी रखडली. उद्घाटनाला तहसीलदार दीपक धीवरे, शेतकरी संघाचे सभापती पंढरीनाथ पाटील आदींची उपस्थिती होती.


342 शेतकर्‍यांनी केली नोंदणी
भुसावळ तालुक्यात आतापर्यंत तब्बल 342 शेतकर्‍यांनी हमी भावाने धान्य खरेदीसाठी नोंदणी केली असून आठ हजार क्विंटल ज्वारीची खरेदी होईल, असे संकेत असताना अवघ्या नऊ दिवसांत ही खरेदी होणार कशी? असाही प्रश्न आहे. खरेदी केंद्रात ज्वारीला दोन 620 रुपये हमीभाव असून केवळ एफएक्यु दर्जाची ज्वारी खरेदी होणार आहे. यामुळे नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांनी या दर्जाचा माल असेल तरच आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

यांची होती उपस्थिती
भरड धान्य केंद्राच्या शुभारंभप्रसंगी शेतकी संघ संचालक गजानन सरोदे, व्यवस्थापक विजय झोपे, ग्रेडर संजय बोंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अशोक पाटील, नायब तहसीलदार शशिकांत इंगळे, पुरवठा अधिकारी नागरगोजे, गोदाम व्यवस्थापक राजेंद्र वाढे, हमाल प्रतिनिधी दीपक बाविस्कर, शेतकरी गजानन नेमाडे, सुनील पाटील, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.

प्रशासनाशी वारंवार संपर्क : आमदार
मका खरेदीसाठी मुदतवाढ शासनाकडून मिळेल, अशी आशा आहे. भुसावळात भरडधान्य खरेदीला निश्‍चितच उशिराने सुरुवात झाली मात्र या संदर्भात स्थानिक तहसीलदार व जिल्हाधिकार्‍यांशी अनेकदा संपर्क साधला मात्र केवळ गोदाम उपलब्ध नसल्याची त्यांनी हतबलता दर्शवली. ज्या शेतकर्‍यांनी ज्वारीसाठी नोंदणी केली आहे निश्‍चित त्यांच्याकडील धान्याची मोजणी होईल, असे आमदार संजय सावकारे म्हणाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !