भुसावळातील गोळीबार प्रकरणी गोलू खरात जाळ्यात


भुसावळ : लॉण्ड्रीचा पत्ता माहित नाही, असे सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून 19 वर्षीय तरुणावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना रेल्वे रुग्णालयाजवळील ख्रिश्‍चन कब्रस्थानजवळ गुरुवार, 9 जुलै 2020 रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेत तक्रारदार आदित्य संजय लोखंडे (19, न्यू आंबेडकर नगर, भुसावळ) हा तरुण जखमी झाला होता. या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील पसार आरोपी गोलू उर्फ राजन खरात (20, रा.समता नगर, भुसावळ) यास सोमवारी सायंकाळी अटक करण्यात आली. आरोपीला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

सात आरोपींविरुद्ध दाखल होता गुन्हा
संशयीत आरोपी चिन्ना याने गुरुवार, 9 रोजी सायंकाळी फोन करून रेल्वे रुग्णालयाजवळील कब्रस्थानजवळ बोलावले तक्रारदाराला ‘सोनू लॉण्ड्री कहाँ’ असे विचारले मात्र मला काय माहित, असे उत्तर दिल्याचा राग आल्याने सातही आरोपींनी चापटा-बुक्क्यांनी तसेच फायटरने मारहाण केली होती तसेच आरोपी क्रमांक 1 ते 3 यांनी गावठी पिस्तुलातून आळी-पाळीने गोळी झाडल्याने गालावर, डाव्या कानाच्या मागे डोक्यावर व डाव्या हाताच्या अंगठ्याजवळील बोटावर दुखापत झाली होती तसेच फिर्यादीच्या ताब्यातील आयफोन कंपनीचा मोबाईल व आपाची कंपनीची दुचाकी (एम.एच.19 ए.झेड.5890) लांबवून आरोपींनी पोबारा केला होता. या प्रकरणी आदित्य संजय लोखंडे या जखमीच्या तक्रारीनुसार संशयीत आरोपी आतीष खरात, हंसराज, गोलू उर्फ राजन खरात, चिन्ना, सुरज, गोविंदा, कपिल कासे (सर्व रा.भुसावळ, पूर्ण नाव माहित नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात काही आरोपींना अटकही करण्यात आली.


गोपनीय माहितीवरून अटक
गोळी प्रकरणातील संशयीत शहरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर शहरचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिस ठाण्यातील विकास सातदिवे, परदेशी परदेशी, चेतन ढाकणे, ईश्‍वर भालेराव आदींनी गोलू उर्फ राजन खरात (20, रा.समता नगर, भुसावळ) यास सोमवारी सायंकाळी अटक केली. आरोपीला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !