ग्रामपंचायत निवडणूक : एकही अर्ज दाखल नाही


भुसावळ 26, रावेर 48, यावल 40, मुक्ताईनगर 51 तर बोदवड तालुक्यातील 29 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक

भुसावळ : ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर प्रत्यक्षात निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली मात्र पहिल्या दिवशी भुसावळ विभागात एकही अर्ज दाखल झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. भुसावळ तालुक्यात 26, रावेर तालुक्यात 48, यावल तालुक्यात 40, मुक्ताईनगर 51, बोदवड 29 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छूकांनी मोर्चेबांधणी केली असून ऐन हिवाळ्यात राजकीय आखाडा मात्र तापला आहे. दरम्यान, शुक्रवारपासून तीन दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुटी राहणार आहे. 25 डिसेंबरला ख्रिसमसची सुटी, शनिवारी चौथा शनिवार आणि रविवारी सुटी असल्याने तीन दिवस उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही.

रावेर : 253 जागांवर महिलांना संधी
रावेर :
रावेर तालुक्यात पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. बुधवारपासून तालुक्यातील एकूण 48 ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेला प्रत्यक्षात सुरुवात झाली. 167 प्रभागातील 452 जागांसाठी नामनिर्देशन पत्रे भरण्यास सुरूवात झाली असून एकूण जागांपैकी 253 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. एप्रिल ते डिसेंबर 20 या काळात तालुक्यातील 48 ग्रामपंचायतीची मुदत संपली मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे ही निवडणूक काही काळ पुढे ढकलण्यात आली. आता 15 जानेवारीला होत असलेल्या या निवडणुकीसाठी बुधवार, 23 पासून नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रियेला सुरूवात झाली. तालुक्यातील निंभोरा बुद्रुक, विवरा बुद्रुक, खानापूर, तांदलवाडी, रसलपूर, केर्‍हाळा बुद्रुक या मोठ्या ग्रामपंचायतींसह एकूण
48 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. धामोडी, मोरगाव खुर्द, तांदलवाडी, निंभोरा बुद्रुक, विवरा बुद्रुक , रसलपूर, केर्‍हाळा बुद्रुक, निंबोल येथील ग्रामपंचायतीची निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण ठरणार आहे.


452 जागांसाठी निवडणूक
निवडणूक होणार्‍या 48 ग्रामपंचायतीच्या 167 प्रभागातील एकूण 452 सदस्यांच्या जागांसाठी23 ते 30 डिसेंबरपर्यंत नामनिर्देशन पत्र इच्छुक उमेदवारांना दाखल करता येणार आहे. एकूण सदस्य पदांपैकी अनुसूचित जातीसाठी 65 जागा, अनुसूचित जमातीसाठी 62 जागा, नागरीकांच्या मागास प्रवर्गासाठी 119 जागा आरक्षित तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 131 जागा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. माजी आमदार अरुण पाटील धामोडी येथील असल्याने या ग्रामपंचायतीची निवडणूक त्यांच्यासाठी महत्वाची तर रसलपूर ग्रामपंचायतीवर भाजपचे जेष्ठ पदाधिकारी सुरेश धनके यांचे वर्चस्व असल्याने त्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

भुसावळ : 26 ग्रामपंचायतीच्या निवडणुका
भुसावळ : तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत असल्यातरी पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. भुसावळ तहसील कार्यालयाच्या आवारातील धान्य गोदामात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एका गोदामात सहा ग्राम पंचायतीची व्यवस्था असून निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक अधिकारी तैनात आहेत. निवडणूक नायब तहसीलदार संजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूकीची प्रक्रीया पार पडत आहे. तहसीलदार दीपक धीवरे यांनी उमेदवारी दाखल करण्याच्या प्रक्रीयेचा सर्वगोदामात जाऊन आढावा घेतला.

ग्रामसेवक नसल्याने इच्छुकांना मनस्ताप
ग्रामपंचायती निवडणुकीसाठी आखाडा तापला असताना इच्छूक उमेदवारांना लागणार्‍या विविधांगी दाखल्यांसाठी स्थानिक स्तरावर ग्रामसेवकाची आवश्यकता आहे मात्र काही ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या ग्रामसेवकांना भुसावळ येथे निवडणूक कामी तैनात करण्यात आल्याने इच्छुकांना दाखले मिळवताना मोठी कसरत करावी लागत आहे. या संदर्भात तहसीलदार दीपक धीवरे यांच्याकडे काहींनी तक्रार केल्याचे समजते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !